पलूस : बांबवडे (ता. पलूस) येथील अल्पवयीन मुलीवर चौघांनी वारंवार सामूहिक बलात्कार केल्याची घटना आज (शुक्रवारी) उघडकीस आली. याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात स्वत: पीडित मुलीने तक्रार दिली असून, तिघांना अटक केली आहे. चौथा दुसऱ्या एका बलात्काराच्या गुन्ह्यात यापूर्वीच अटकेत आहे. अरविंद पंडित पवार (वय २८), पंकज पांडुरंग पवार (१९), सचिन पोपट जाधव (२०, सर्व रा. बांबवडे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. चौथा संशयित प्रशांत शहाजी पाटील (१९, रा. जाखापूर, ता. कवठेमहांकाळ) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. चौघेही संशयित पीडित मुलीचे जवळचे नातेवाईक आहेत. पीडित मुलगी बांबवडे येथेच राहते. तिचे वडील व्यसनी असून आईचे निधन झाले आहे. तिची गरिबीची परिस्थिती आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन संशयितांनी एक वर्षापासून तिचे लैंगिक शोषण केले आहे. पीडित मुलीने हा प्रकार कोणास सांगू नये यासाठी तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती. परंतु या लैंगिक शोषणातून संबंधित मुलीस गर्भधारणा झाली आणि तिने मुलीला जन्म दिला. आज तिने स्वत:हून सांगलीतील रुग्णालयात पोलिसांकडे ही तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, उपनिरीक्षक आनंदराव देसाई, सहाय्यक पोलीस फौजदार कदम, हवालदार मोहन चव्हाण, सदाशिव शिंदे, श्रीकांत कोकीतकर, टी. आर. शिंदे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
बांबवडेत मुलीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक
By admin | Published: October 31, 2014 11:44 PM