सांगली : शहरातील उपनगरांसह बुधगाव येथे एकाच रात्रीत १५ दुकाने फोडत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शहरातील यशवंतनगर, रामकृष्णनगरसह बुधगाव (ता. मिरज) येथे ही घटना घडली. सर्वच ठिकाणी एकाच प्रकारे दुकानांचे शटर उचकटून दुकाने फोडण्यात आल्याने, एकाच टोळीने चोरीचे प्रकार केल्याची शक्यता आहे. यातून पाच हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या चोरीच्या घटनेची सांगली, संजयनगर, कुपवाड औद्योगिक पोलीसात नोंद आहे.बुधगाव येथे बुधवारी रात्री सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केल्यानंतर, पाळतीवरच असलेल्या चोरट्यांनी सलग १५ गाळ्यांचे शटर उचकटत चोरी केली. यात संदीप चव्हाण यांच्या श्री सिद्धनाथ अॅल्युमिनिअम व ग्लास वर्क्स या दुकानात चोरीचा प्रयत्न झाला. मोहन पाटील यांच्या आदित्य कलेक्शन अँड स्पोर्ट गारमेंट या दुकानातून दोनशे रुपये लंपास करण्यात आले.
अश्विनी माळी यांच्या सेजल कलेक्शनमधून पाचशे रुपयांची चिल्लर, संतोष पाटील यांच्या त्रिमूर्ती मेडिकलमधून एक हजार, अनिल पाटील यांच्या किराणा स्टोअर्स येथून पंधराशे रूपये, शिवनेरी पान शॉपमधून सातशे रूपयांच्या सिगारेटची चोरी करण्यात आली.संदीप पाटील यांचे श्री गणेश मोबाईल हे दुकान, विकास कांबळे यांचे रोहिदास फूटवेअर, संतोष भारती यांच्या श्री इलेक्ट्रीकलमध्येही चोरीचा प्रयत्न झाला. येथून चोरट्यांनी दीडच्या सुमारास देशी दारू दुकानही फोडून चारशे रूपयांची चोरी करून दारूच्या बाटल्या फोडून नुकसान केले. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी यशवंतनगर परिसरात चोऱ्या केल्या.
यात मुख्य चौकातीलच स्वीट कॉर्नर या बेकरीतून आठशे रुपये लंपास केले, तर एस. एन. पान शॉप, एस. के. केशकर्तनालय, हनुमान सप्लायर्स या दुकानातही चोरीचा प्रयत्न केला. तसेच रामकृष्णनगर येथील हनुमान सप्लायर्स दुकानातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची पोलिसात नोंद आहे.