सांगली,11 : येथील वानलेस चेस्ट हॉस्पीटलच्या क्वॉटर्समध्ये डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. राहूल जयेंद्र लोंढे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. नाजूक संबंधातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा संशय असून चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत नोंद झाली आहे.
सांगली-मिरज रस्त्यावरील वानलेसवाडी येथील चेस्ट हॉस्पीटलच्या परिसरात राहूल लोंढे हा आई, वडीलांसह रहात होता. रुग्णालयाच्या बंद पडलेल्या ओपीडीलगतच त्याचे घर आहे. राहूल हा रुग्णालयात वार्डबॉय म्हणून काम करीत होता. आठ दिवसांपूर्वी त्याने आदित्य हॉस्पीटलमधील नोकरी सोडली होती. त्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. त्याचे वडील भारती हॉस्पीटलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तर भाऊ बेळगाव येथे वॉर्डबॉय म्हणून काम करतो. त्यासाठी त्याने बेळगाव येथील भावालाही संपर्क केला होता. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे.
मंगळवारी राहूल हा कुपवाड येथील एका कार्यक्रमासाठी गेला होता. तेथून तो मित्राच्या वाढदिवसालाही हजर होता. वाढदिवसाचा केक कापून तो रात्री साडेअकराच्या सुमारास घरी परतला. त्यानंतर तो घरी झोपी गेला. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्याला अज्ञात व्यक्तीने हाक मारली. ही हाक ऐकून तो उठला. बहिणीकडून त्याने चादर मागवून घेतली आणि घराबाहेर आला. सकाळी राहूल घरात नसल्याचे पाहून त्याच्या आईने शोधाशोध सुरू केली.
घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका झाडाच्या कट्ट्याखाली त्याचे मित्र बसले होते. आईने या मित्राकडे चौकशी केली. पण त्यांनीही त्याला पाहिले नसल्याचे सांगितले. आई घराकडे परतत असताना जुन्या बंद ओपीडीच्या एका खोलीजवळ त्याची चप्पल पडलेली दिसली.
आईने खोलीचा दरवाजा उघडला असता आतमध्ये राहूल हा रक्ताच्या थोराळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता. हे दृश्य पाहून आईने हंबरडा फोडला. तिचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्याच्या घराशेजारीच राहूलच्या मामाचेही कुटूंब आहे. त्यांनीही धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.