सांगली : अंकली ते सांगली या महामार्गाच्या दुरवस्थेप्रश्नी संताप व्यक्त करीत बुधवारी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणीसमोरील मोठ्या खड्ड्यात ‘मृत्युंजय महामंत्र’ पठणाचे अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तातडीने हा रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा त्यांनी दिला.
‘लोकमत’ने याप्रश्नी वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. एकीकडे सांगली-तुंग रस्तेप्रश्नी नागरिक जागृती मंचने आंदोलन छेडले असताना, अंकली-सांगली रस्त्यासाठी दलित महासंघानेही आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील मोठ्या खड्ड्यात मृत्युंजय महामंत्र पठण व खड्डेपूजा करीत अनोखे आंदोलन केले. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली ही आरोग्यपंढरी म्हणूनही ओळखली जाते. येथील बाजारपेठ, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व प्रसिद्ध गणपती मंदिर अशा गोष्टींमुळे सांगलीकडे जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून येणाºया लोकांची, वाहनांची संख्या मोठी आहे. काही भ्रष्ट अधिकाºयांमुळे येथील रस्त्यांमध्येच भ्रष्टाचार होऊ लागला आहे.
सांगली-कोल्हापूर मार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर आहे. शासनाच्या डोळ््यात धूळफेक करून कोट्यवधीचा घोटाळा रस्ते कामात झाल्याचा आमचा संशय आहे. त्यामुळे ठेकेदाराची संबंधित अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी. ठेकेदाराशी लागेबांधे असलेल्या अधिकाºयांचीही चौकशी व्हावी. रस्ते दुरवस्थेला जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर फौजदारीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. दोषी आढळणाऱ्या अधिकाºयांना तातडीने बडतर्फसुद्धा करावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी केले. यात अमोल सूर्यवंशी, सौ. शीतल मोहिते, ज्योती मोहिते, वनिता कांबळे, सुनील वारे, अजित आवळे, महेश देवकुळे सहभागी झाले होते.
आंदोलन तीव्र करू!सांगली-कोल्हापूर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. केवळ पॅचवर्क न करता हा रस्ता नव्याने चांगल्या दर्जाचा करावा. चौपदरीकरणाची संपूर्ण प्रक्रिया व निविदेमध्ये उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव रस्तेकामात प्रत्यक्ष करावा, अशी मागणी उत्तम मोहिते यांनी यावेळी केली.