सांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा गुंड संजय प्रकाश माने याच्याबाबत कारागृह अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखविला आहे. पॅरोलची मुदत संपल्यानंतरही दोन दिवस हा गुंड कारागृहात हजर का झाला नाही, असा सवाल भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.केळकर म्हणाल्या की, पॅरोलची मुदत संपल्यानंतर संजय माने हा कारागृहात हजर झाला नाही. याचदरम्यान त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे सांगितले. पॅरोलची मुदत संपल्यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी संजयनगर पोलिसांना त्याबाबत माहिती कळवायला हवी होती. ती कळविली नाही. त्यामुळे कारागृह अधिकाऱ्यांची चौकशी करावी.
त्या म्हणाल्या, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावी, या खटल्यात सरकारी वकील म्हणून इस्लामपूरच्या शुभांगी पाटील यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याला गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोलकाता येथील घटनेनंतर सांगली, मिरज सिव्हीलला भेट देऊन डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या. बदलापूरनंतर शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून शाळेत सीसीटीव्ही, सखी सावित्री समिती, विशाखा समितीसाठी पाठपुरावा केला. लवकरच आम्ही विद्यार्थी-पालक मेळावा घेऊन जनजागृतीही करणार आहोत, असेही केळकर यांनी स्पष्ट केले.
पॅरोलबाबत सोमवारपर्यंत माहितीकेळकर म्हणाल्या की, संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्याकडे संजय मानेच्या पॅरोलप्रकरणी विचारणा केली. त्यावर कुरळे यांनी संजय माने याच्या पॅरोलबाबत कारागृह प्रशासनाशी संपर्क साधल्याचे सांगितले. सोमवारपर्यंत पॅरोलबाबत माहिती मिळेल, असेही कुरळे यांनी सांगितले आहे.