आष्टा : आष्टा शहरातील गंजीखान्याची जागा शेतकऱ्यांची असल्याने तेथे रस्ते, गटार व विजेची सोय करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे पुनर्वसन या जागेवर करण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
आष्टा शहरातील आष्टा-तासगाव मार्गावरील ‘म्हाडा’ची जागा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर होती. मात्र, तेथे घरकुल योजना न झाल्याने जिल्हाधिकारी यांनी ती परत घेतली आहे. या ठिकाणीच आष्टा शहरातील शेतकऱ्यांची गंजीखाना जागा आहे. या ठिकाणी पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित जागा जेसीबीच्या साहाय्याने सपाट करण्यात आली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या नावावरील जागा घेतल्याने असंतोष आहे.
गंजीखाना मालकी असलेल्या काही शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची आष्टा येथील राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष उदय कुशिरे यांच्या घरी भेट घेतली. यावेळी अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कारखाना संचालक विराज शिंदे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, माणिक शेळके, संग्राम फडतरे, झुंजारराव पाटील, उदय कुशिरे, अनिल पाटील, व्ही. डी. पाटील, संग्राम जाधव उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील यांनी सर्व सदस्यांशी चर्चा केली व संबंधित जागा शासनाने परत घेतलेली नाही, तेथे संबंधित लाभधारकांचे पुनर्वसन करण्यात येईल. पालिकेच्यावतीने सोयी-सुविधा देण्यात येतील. कोणीही घाबरून जाऊ नये, असे आश्वासन दिले.