सांगली : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ कर्मचारी यांची भरती केली होती. परंतु दुसरी लाट कमी होताच १०८ डॉक्टर्स, परिचारिकांना नारळ देण्यात आला. डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली. आता तिसरी लाट आल्यास पुन्हा कंत्राटी डॉक्टर, परिचारिकांचा शोध घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेने कोरोना काळात १०० डॉक्टर, ३६० परिचारिका आणि सेवकांची भरती करण्यात केली होती. दुसरी लाट ओसरल्यानंतर यापैकी २० डॉक्टर, ८८ परिचारिकांना कामावरून कमी करण्यात आले. या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून साधे अनुभव प्रमाणपत्रही देण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यानंतर त्यांना तुम्ही जिथे काम केले, तेथून घ्या, असे सांगण्यात आले. जुलै महिन्यातील कामाचे मानधनही मिळाले नाही. त्यामुळे मानधनासाठी कर्मचाऱ्यांना खेटे मारावे लागत आहेत. अशा परिस्थितीत हे कर्मचारी आता बेरोजगार बनले आहेत.
कोट
डॉक्टर, परिचारिकांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली. अजूनही कोरोना रुग्ण संख्या कमी झाली नाही. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज असतांना कंत्राटी डॉक्टर, परिचारिकांना कमी करणे योग्य नाही. याचा परिणाम लसीकरणावर होणार असल्यामुळे शासनाने विचार करावा.
-डॉ. अमितकुमार सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष, समुदाय आरोग्य अधिकारी संघटना.
कोट
कोरोनात रुग्णसेवा प्रामाणिक केली. आठ तासांपेक्षाही अधिकचे काम केले. परंतु त्या बदल्यात आम्हांला कामावरून कमी करण्यात आले. हा अन्याय आहे. किमान अकरा महिने तरी कामावर ठेवण्याची गरज होती. अचानक काढल्यामुळे आता कुठे काम मिळणार नाही.
- दीपाली लोंढे, कंत्राटी परिचारिका.
कोट
कोरोना काळात जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली. परंतु काम संपताच शासनाने पुन्हा आम्हांला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने विचार करावा.
- समाधान खरात, आरोग्य सेवक.
कोट
शासनाकडून निधी आला नसल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात अडचणी येत होत्या. म्हणूनच शासनाच्या धोरणानुसारच कमी केले आहे. पुन्हा गरज लागल्यास प्राधान्याने डॉक्टर, परिचारिकांना घेण्यात येणार आहे.
-डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
चौकट
पुन्हा तिसरी लाट आली तर...
-पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता आता तिसरी लाट आल्यास कसे नियोजन करणार? हा प्रश्न आहे. कामावरून कमी केलेल्या डॉक्टर, परिचारिकांना पुन्हा कामावर घेण्यात येऊ शकते.
-प्रत्येक लाटेत भरती करण्यापेक्षा कंत्राटी डॉक्टर, परिचारिकांना ११ महिन्यांसाठी कामावर नियमित ठेवल्यास कोरोना आटोक्यात येईल. तसेच लसीकरणालाही गती मिळेल.
चौकट
कोरोना गेला, नोकरी गेली!
कंत्राटी प्रकार किती घेतले? कितीजणांना काढले?
डॉक्टर्स १०० २०
परिचारिका ३६० ८८
तंत्रज्ञ १६ ००