सांगली : मनाला सुखावणाऱ्या गीत, वाद्यांचा ताल अन् तालावरचे शिस्तबद्ध पदलालित्य यांचा सुंदर सोहळा म्हणजे गरबा. दोन वर्षांपासून कोरोनाच्या बंधनात अडकलेली पावले यंदा प्रदीर्घ काळानंतर उत्साहाच्या लाटांवर थिरकरणार आहेत. सांगली शहर व परिसरात गरबा व दांडियांच्या खेळाची जय्यत तयारी वेगवेगळ्या संघटना, ग्रुपच्या माध्यमातून सुरू झाली आहे. त्यामुळे यंदा ‘गरबो रमतो जाय’चा आवाज शहरभर घुमणार आहे.
सांगलीतील गरबा व दांडिया नृत्याची परंपरा खूप जुनी आहे. रतनशीनगरमध्ये ४० वर्षांपासून अंबामातेच्या मंदिरासमोर गरब्याचा फेर धरला जातोय. गुजराती समाजाने सुरू केलेली ही परंपरा आता अन्य समाजातही रुजली आहे. नवरात्रोत्सवात या नृत्य प्रकारांनी रंग भरला जातो. मातेचा जागरही केला जातो. गेल्या दोन वर्षांत अनेक मंडळांनी साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला. निर्बंध असल्याने मनातल्या उत्साहांना बांध घातला गेला. यंदा बांध फुटणार आहे. गरबा व दांडिया खेळाची रंगीत तालीम गेले आठवडाभर सुरू झाली आहे. विविध ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण शहर यंदा या नृत्यात रंगणार आहे.
याठिकाणी होणार मोठे सोहळे
रतनशीनगरमध्ये अतुल शहा यांच्या ‘स्वरधारा’ ग्रुपच्या वतीने २६ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता गरबा रास दांडिया कार्यक्रम होणार आहे.शरद शहा यांच्या ‘मेलडी’ ग्रुपच्या वतीने ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असा पाच दिवसांचा गरबा नृत्य सोहळा सांगलीच्या शांतिनिकेतन कॉलेजच्या मैदानावर आयोजित केला आहे.
सर्वमंगल ग्रुप व सेव्हन ॲव्हेन्यू बझारच्या वतीने कोल्हापूर रोडवरील मॉलच्या पटांगणात रविवारी सायंकाळी ७ वाजता डीजे गरबा नाइटचे आयोजन केले आहे. गुजराती समाजाच्या वतीने सेव्हन ॲव्हेन्यूच्या पटांगणातच २९ सप्टेंबरला गरबा दांडियाचा खेळ रंगणार आहे.सांगलीच्या गावभाग परिसरात केशवनाथ मंदिर परिसर, नवभारत मंडळाच्या पटांगणावरही नवरात्रोत्सवात दांडिया खेळाचे आयोजन केले आहे.
अभिनेते, राजकीय नेत्यांचाही सहभाग
सोहळ्यांसाठी सिने अभिनेते, राजकीय नेते यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. सर्वमंगल ग्रुपच्या कार्यक्रमास अभिनेते अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. अन्य सोहळ्यांसाठीही ‘सेलिब्रिटीं’ना निमंत्रित करण्यात येणार आहे.