सांगली : शहरातील आमराई उद्यानात मिनी रेल्वे धावणार आहे. खासगी तत्त्वावर ही रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव नववर्षादिवशी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सध्या आमराई उद्यानाच्या सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. उद्यानातील मुख्य रस्ता डांबरी करण्यात आला आहे. तसेच कारंजे व इतर सुविधाही निर्माण केल्या जाणार आहेत. त्यात आता गार्डन ट्रेनची भर पडणार आहे. त्यासाठी २५० ते ३०० मीटर लांबीचे वर्तुळाकर ट्रॅक तयार केला जाणार आहे. संपूर्ण खासगी तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ट्रेनसाठी रुळ, प्लॅटफाॅर्म, उड्डाणपूल तयार करण्याची जबाबदारी ठेकेदाराची राहील. २९ वर्षांसाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असून, प्रतिव्यक्ती २५ रुपये तिकीटदर असेल. प्रशासनाने अटी व शर्तीच्या अधीन राहून गार्डन ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला आहे. येत्या १ जानेवारी रोजी स्थायीची सभा होत आहे. या सभेत गार्डन ट्रेनच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
याशिवाय विद्युत साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा विषयही समितीसमोर आहे. या ठेकेदाराने वर्षभरापासून साहित्याचा पुरवठा केलेला नाही. शासनाच्या १०० कोटींच्या निधीतून कोल्हापूर रोडवरील ज्योतिरामदादा सावर्डेकर आखाड्याचे नूतनीकरण व शाॅपिंग काॅम्प्लेक्सचा प्रस्ताव होता. त्यासाठी १ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद केली होती. आता हा प्रस्ताव रद्द करून त्याजागी प्रभागातील कामे सूचविण्याचा विषयावर स्थायीत चर्चा होणार आहे.