अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: गेल्या काही आठवड्यांपासून लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेला नाही. फोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या लसणाचा दर प्रतिकिलो १५० ते १६० रुपये पार गेला आहे. क्षेत्र घटल्यामुळे आणि बाजारात वाढलेल्या मागणीमुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आल्याला यंदा सर्वाधिक म्हणजे किलोला २०० रुपयांवर भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत असला तरी ग्राहकांमध्ये मात्र काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे.
सातारी आल्याला विशेष भाव असतो. सातारा परिसरातून मोठ्या प्रमाणात आल्याची आवक होत असल्याने त्या आल्याला 'सातारी आले' असे नाव पडले आहे. त्याशिवाय विजापूर, बेळगाव भागातूनही आल्याची आवक होत आहे. खाद्यपदार्थांपासून चहापर्यंत आल्याचा वापर सर्रास होत असल्याने त्याला मागणी कायम असते. सध्या लग्नकार्याचा हंगाम असल्यानेही आल्याला विशेष मागणी वाढल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले. होलसेल प्रतिकिलो १५० रुपये, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो २०० रुपयांवर सुरू असल्याचे दिसत आहे. आल्याबरोबरच लसणाची फोडणीही महागल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी लसूण १०० रुपयांना चार किलो मिळत होता. तोच लसूण सध्या १५० ते १६० रुपये किलो झाल्याचे दिसत आहे.
देशी लसूण २५० रुपये किलो
देशी लसून खूपच कमी प्रमाणात बाजारात विक्रीस येत आहे. जर उपलब्ध झाल्यास त्याचा भाव किलो २०० ते २५० रुपये आहे. देशी लसूण चवीला चांगला असल्यामुळे मागणी जास्त आहे. भविष्यात देशी लसूण मिळणेच कठीण होईल, अशी परिस्थिती आहे, असे मत भाजीपाला विक्रेते शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
पाऊस नसल्यामुळे लसूण, आल्याची लावणच फार कमी झाली आहे. सांगली बाजारात येणारे बहुतांशी आले हे साताऱ्याहून येत आहे. उत्पन्न कमी असल्यामुळे लसूण किरकोळ बाजारात प्रतिकिलो १५० ते १८० रुपयेपर्यंत विक्री होत आहे. आल्याचा दर मात्र २०० रुपये किलो झाला आहे. -बाळू खरात, भाजीपाला विक्रेते
लसूण, आल्याचे जिल्ह्यात नगण्य क्षेत्र
कडेगाव, खानापूर, मिरज आणि तासगाव तालुक्यांत १० ते २० हेक्टरवरच आल्याची लावण होत आहे. जिल्ह्यात आले, लसणाचे नगण्य क्षेत्र असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची गरज बाहेरील जिल्हे आणि राज्यातूनच भागविली जात आहे.