संतोष भिसे - लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या वर्षभरात घरगुती गॅस २५० रुपयांनी महागला आहे, यामुळे महिलावर्गाची डोकेदुखी वाढली आहे.
गेल्या १ जुलै रोजी थेट २५ रुपयांनी गॅस भडकला. जून महिन्यात ८०८ रुपयांना मिळणारा गॅस १ जुलै रोजी ८३४ वर गेला. लॉकडाऊनमध्ये पैशांची आवक ठप्प झाल्याच्या काळात गॅसची महागाई होरपळून काढत आहे. गॅसच्या काटकसरीबाबत गृहिणी भलत्याच संवेदनशील बनल्या आहेत. स्वयंपाक, चहा अशा कामांसाठीच गॅस वापरून अन्य कामांसाठी चुलींचा वापर करीत आहेत. अंघोळीचे पाणी, जास्त सदस्यांचा स्वयंपाक यासाठी सरपणाचा वापर वाढला आहे. उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांनी तर नवा सिलिंडर भरून घेणे थांबविले आहे.
महिना सिलिंडरचे दर
जुलै २० ६११
ऑगस्ट ६११
सप्टेंबर ६११
ऑक्टोबर ६११
नोव्हेंबर ६११
डिसेंबर ६८३
जानेवारी २०२१ ७१०
फेब्रुवारी ७६३
मार्च ८१०
एप्रिल ७९५
मे ७९५
जून ८०५
जुलै २०२१ ८३४
कोट
आता चुलींशिवाय पर्याय नाही
गॅसच्या दरवाढीने घरखर्चात वाढ झाली आहे. गॅसच्या बचतीसाठी प्रयत्न करावे लागतात. पाणी तापविण्यासारख्या कामांसाठी गॅसचा वापर बंद केला आहे. फक्त स्वयंपाकासाठीच वापर करते. गॅसचा वापर आता चैनीची बाब ठरू लागला आहे.
- रोहिणी कोरे, गृहिणी, सांगलीवाडी
लॉकडाऊनमध्ये लोकांना दिलासा देण्याऐवजी महागाईत लोटण्याचे काम सरकार करीत आहे. व्यवसाय, धंदे बंद असल्याने उत्पन्न कमी झाले आहे. पेट्रोलसोबत गॅस दरवाढीने सर्वसामान्य कुटुंबांचा खर्च वाढतच आहे. अनावश्यक खर्चांना कात्री देऊनही महिन्याचे बजेट कोलमडत आहे. सरकार यावर विचार करणार की नाही, असा प्रश्न आहे.
जुई घार्गे, गृहिणी, मिरज.