उमदी : सोनलगी (ता. जत) येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चौदा वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला, तर त्याची आई गंभीररीत्या जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. कामेश तुकाराम कोळी यांच्या मालकीचे घर व पंक्चरचे दुकान सोनलगी येथील मध्यवर्ती ठिकाणी आंबेडकरनगर येथे आहे. पत्नी व दोन मुलांसह ते या ठिकाणी राहतात. रविवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात त्यांचा मुलगा अभिषेक (वय १४) हा जागीच ठार झाला, तर पत्नी रेखा (३५) या गंभीर जखमी झाल्या. त्यांंना उपचारासाठी सोलापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गॅसच्या स्फोटानंतर घरातील प्रापंचिक व व्यावसायिक साहित्य जळून खाक झाले आहे. स्फोटावेळी धुराचे लोट घरातून बाहेर पडत होते. गॅस स्फोटानंतर येथील नागरिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग उशिरापर्यंत आटोक्यात येऊ शकली नाही. त्यातच पाण्याची तीव्र टंचाई असल्याने आग विझविण्यासाठी पाणी मिळविणे अवघड झाले होते. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण सपांगे, तलाठी हिप्परकर, नितीन कुंभार यांनी पंचनामा केला. जळालेल्या मृतदेहाची विच्छेदन तपासणी घटनास्थळीच करण्यात आली व मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शेजारी असलेल्या घरातील रेशनचे गहू, तांदूळ, साखर हे साहित्यही जळून खाक झाले आहे. घटनास्थळी काँग्रेस जि. प. सदस्य विक्रम सावंत व माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. चन्नाप्पा होर्तीकर, माजी पं. स. सदस्या सुकन्या कांबळे, नूतन पं. स. सदस्या लता कुल्लोळी यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.गॅस सिलिंडरच्या स्फोटाची सोनलगी गावातील ही पहिलीच घटना असून, कामेश कोळी यांचे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. त्यांना शासकीय मदत मिळाली पाहिजे, असे मत सरपंच पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
गॅस सिलिंडर स्फोटात मुलगा ठार
By admin | Published: April 09, 2017 11:32 PM