आष्टा : मिरजवाडी (ता. वाळवा) येथील हबळ वस्ती येथे शेतमजुराच्या घरात गॅस सिलिंडरच्या स्फोटात सुमारे तीन लाखांची हानी झाली. मंगळवारी (दि. ४) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.दुर्घटनेत महादेव बसाप्पा तोरवे यांचा संसार उघड्यावर आला. पत्नी व दोन मुलांसह ते पत्र्याच्या शेडमध्ये राहण्यास होते. त्यांच्या घराचे काम सुरू असल्याने पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. मंगळवारी सकाळी पत्नी स्वयंपाक करीत असताना गॅसचा वास येऊ लागला. गॅसगळती झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीय त्वरित घराबाहेर पडले.तोपर्यंत प्रचंड मोठ्या आवाजासह सिलिंडरचा स्फोट झाला. घरातील तिजोरी, कपाटासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. म्हशीच्या विक्रीनंतर मिळालेले ८० हजार रुपये व सुमारे एक तोळा सोन्याचे दागिने, तसेच कपडे व अन्य साहित्य जळून खाक झाले.परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. आष्टा पालिकेच्या अग्निशमन गाडीनेही मदत केली. पोलिस निरीक्षक अजित सिद, पोलिस पाटील हरिदास पाटील, एस. जी. काकतकर, तसेच गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
सांगलीतील मिरजवाडीत गॅस सिलिंडरचा स्फोट, सुदैवाने कुटुंबीय बालबाल बचावले; तीन लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 12:21 PM