सांगली : महागाई कमी करण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढविले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर महागाई गेली आहे. याच्या निषेधार्थ मदनभाऊ युवा मंचने आज, शुक्रवारी अनोखे आंदोलन केले. कृष्णा नदीत सिलिंडर अर्पण करून केंद्र शासनाचा निषेध केला.युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लेंगरे म्हणाले की, अच्छे दिन, सबका साथ, सब का विकास अशा घोषणा देत जनतेला फसवून मोदी सरकार सत्तेवर आले. महागाई कमी न करता दिवसेंदिवस वाढवत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहे. त्यात घरगुती गॅस सिलिंडरची भर पडली आहे. सध्या साडेनऊशे पेक्षा अधिक रुपये सिलिंडरला मोजावे लागत आहेत. दोन कोटी रोजगार, १५ लाख खात्यावर वर्ग करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. देश स्वांतत्र झाल्यापासून सर्वात जास्त महागाईचे प्रमाण मोदी सरकारच्या काळात झाले आहे.याच्या निषेधार्थ मदनभाऊ पाटील युवा मंच्याकडून सांगलीतील कृष्णा नदीला घरगुती गॅस सिलिंडर अर्पण करण्यात आला. यापूर्वीही महागाईच्या विरोधात बैलगाडी मोर्चा, साखर वाटप आंदोलन, मोटार सायकल आत्महत्या अशा प्रकारची उपरोधात्मक आंदोलने केली आहेत.मोदी सरकार भांडवलदारांचे व उद्योगपतींचे सरकार असून त्यांना सर्व सामान्य जनतेशी काही देणे घेणे नाही. हा चौकीदार देशाला परवडणारा नाही, अशी टीकाही त्यांनी केली.या आंदोलनात नगरसेवक प्रकाश मुळके, युवा मंचाचे कार्याध्यक्ष शीतल लोंढे, माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.या आंदोलनात शीतल लोंढे, नगरसेवक प्रकाश मुळके, माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी, प्रवीण निकम, शेखर पाटील, मयूर बांगर, अवधूत गवळी, आमित लाळगे, जयराज बर्गे, शानू शेख, अक्षय दैडमणी, नितीन भगत, सुहास पाटील, प्रथमेश भंडे, राम कुट्टे, राहुल मोरे, प्रकाश लोखंडे आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Inflation: महागाईच्या निषेधार्थ गॅस सिलेंडर कृष्णा नदीत अर्पण, सांगलीत अनोखे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 3:44 PM