मिरज : मिरजेत गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने आज सात नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या फिरत्या पथकाद्वारे अतिसाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात आज सात अतिसाराचे रुग्ण दाखल झाले. गॅस्ट्रोची लागण झालेले रुग्ण ब्राह्मणपुरी, गुरुवारपेठ, नदीवेस, ऐनापुरे मळा येथील आहेत. भारती हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यास गॅस्ट्रोची लागण झाली असून, त्यास उपचारासाठी भारती हॉस्पिलटमध्ये दाखल करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिंडीवेस, बोलवाड रस्ता, समतानगर यासह विविध ठिकाणी सर्वेक्षण करून अतिसाराची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले. दूषित पाण्याच्या तक्रारी असलेल्या ठिकाणी पाणी शुध्दीकरणासाठी मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले. पाणी पुरवठा विभागाकडून जीर्ण अवस्थेतील जलवाहिन्यांचा पाणीपुरवठा बंद करून जुन्या जलवाहिन्यांची स्वच्छता सुरू केली आहे. दूषित पाण्याची तीव्रता कमी झाल्यामुळे गॅस्ट्रोची साथ नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)महापालिका क्षेत्रात २५ रुग्णांवर उपचार सुरू सांगली, मिरजेमध्ये गॅस्ट्रोचे सोमवारअखेर २५ रुग्ण दाखल झाले होते. यापैकी १२ रुग्णांना उपचाराअंती घरी पाठविण्यात आले आहे. आज आणखी बारा रुग्ण दाखल झाले. यात मिरजेमध्ये १५, तर सांगलीमध्ये १० रुग्ण दाखल आहेत. एकूण २५ रुग्णांवर सध्या उपचार सुरूआहेत. महापालिकेच्या उपाययोजनांमुळे गॅस्ट्रो नियंत्रणाखाली आणण्यात यश आले आहे.
गॅस्ट्रोचे आणखी सात रुग्ण; फिरत्या पथकाद्वारे उपचार
By admin | Published: December 02, 2014 10:25 PM