शिराळा : शिराळा तालुक्यातील मोरणा धरण जवळील बामनकी परिसरात आज शुक्रवारी चार गव्यांचे दर्शन झाले. यानंतर हे गवे तडवळे येथून जंगल परिसरात गेले. यामुळे शेतकरी, नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.आज सकाळच्या सुमारास गवे मोरणा धरण काठावर बसल्याचे काही नागरिकांना दिसले. गव्यांना नागरिकांनी हुसकवले असता ते उपवळे, तडवळे येथून पुढे जंगलात निघून गेले. या गव्यांनी गायकवाड मळ्यात पिकांचे नुकसान केल्याचे आढळून आले आहे.याआधीही शहरा नजीक असणाऱ्या गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी, धुमालवाडी, बिऊर, पावलेवाडी, भाटशिरगाव परिसरात गव्यांचे दर्शन झाले होते. या गव्यांना सुजयनगर परिसरात हुसकवले असता त्यावेळी हे गवे ऊसाच्या शेतीत घुसले. याचवेळी उसातून बिबट्या बाहेर आला होता.शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती तर शेतांच्या कामात व्यत्यय येत आहे. या बिबट्यांचा व गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. चांदोली राष्ट्रीय उद्याना मध्ये अपेक्षित खाद्य मिळत नसलेने बाहेर मानवीवस्तीत प्राण्यांचा वावर वाढला आहे.वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत देशमुख, देवकी तसीलदार, हणमंत पाटील, संपत देसाई, बाबा गायकवाड, नामदेव सिद, संभाजी पाटील यांनी या परीसराची पाहणी केली.
शिराळा तालुक्यात गव्यांचा वावर नागरी वस्तीत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 7:35 PM