पुनवत (जि. सांगली) : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथून कालव्यातून सुटका केलेला गवा आकुर्ळे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील उजव्या कालव्यात उतरल्याचे शुक्रवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आले. रिळे, बेलेवाडी परिसरातून कळपातून बाहेर पडलेल्या या गव्याने शिराळे खुर्द-माणगाव मार्गे आकुर्ळेपर्यंतचा प्रवास केला. मात्र, त्याचा कळपात पोहोचण्याचा वनवास काही संपलेला नाही.रिळे, बेलेवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गव्यांचा कळप आला आहे. या कळपातील एक गवा रिळे, फुपेरे, शिराळे खुर्द येथून भटकंती करत थेट शाहूवाडी तालुक्यातील माणगाव-आकुर्ळे गावापर्यंत पोहोचला आहे. शिराळे खुर्द येथे हा गवा वारणा डावा कालव्यात अडकला होता. त्याची वन विभागाने सुटका केली. मात्र, त्यानंतर तो नदीपार करून आकुर्ळे येथे पोहोचला आहे. रिळेपासून निघालेल्या या गव्याने जवळजवळ दहा किलोमीटर अंतर पार केले आहे. शुक्रवारी आकुर्ळे येथील माध्यमिक विद्यालय परिसरातील वारणा उजवा कालव्यात तो उतरला असल्याचे स्थनिकांनी पाहिले. कळपाच्या शोधात असलेला हा गवा कधीही आक्रमक होऊ शकतो. त्यामुळे मानवी वस्तीत धोका होऊ शकतो.
वन विभागाने या गव्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना त्वरित करून या गव्याला योग्य अधिवासात पोहोचविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे. - प्रा. अक्षय दगडू पाटील, प्राणीमित्र, आकुर्ळे.