सांगली : गौरी-गणपती सणासाठी मुंबईहून सांगली जिल्ह्यात येण्यासाठी एस. टी.च्या सांगली विभागाने दहा आगारांतून ९० जादा बसेस दि. ७ सप्टेंबर कालावधीत सोडल्या आहेत. तसेच परतीच्या वाहतुकीसाठी दि. १४ ते २० सप्टेंबर या कालावधीतही जादा बसेसची व्यवस्था केली आहे.
गौरी-गणपतीसाठी मुंबई, पुणे शहरांतून सांगली जिल्ह्यात प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊनच मुंबई, पुणे मार्गांवर जादा बसेस सोडल्या आहेत. प्रवाशांना मुंबईहून येण्यासाठी सांगली आगाराने ८, मिरज १०, इस्लामपूर १०, तासगाव १२, विटा ८, जत ८, आटपाडी ८, क. महांकाळ १०, शिराळा १०, पलूस आगारातून ६ बसेस सोडण्यात येणार आहेत. या जादा बसेस सोमवार, दि. ६ पासूनच मुंबईतून सुरु झाल्या आहेत. मुंबईबरोबरच पुणे येथूनही जादा बसेस सोडल्या आहेत, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या सांगली विभागाचे आगारप्रमुख अरुण वाघाटे यांनी दिली.