सांगली : महाराष्ट्र राज्य अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सांगलीच्या गौतम पाटील यांची फेरनिवड झाली.महाराष्ट्र राज्य अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनची वार्षिक सभा शुक्रवारी पुणे येथे पार पडली. या सभेत पुढील पाच वर्षांसाठी गौतम पाटील यांची फेरनिवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी आमदार संजय केळकर, सचिवपदी महेंद्र चेंबूरकर, खजिनदारपदी सविता मराठे यांची निवड करण्यात आली.जिम्नॅस्टिक फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव शांतिकुमार यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तानाजीराव गायकवाड यांनी काम पाहिले. गौतम पाटील यांच्या फेरनिवडीनंतर सांगली जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षकांनी शांतिनिकेतन परिसरात जल्लोष साजरा केला. अनेक क्रीडा संघटनांकडून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.यशस्वी कामगिरीमहाराष्ट्र राज्य अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्षात गौतम पाटील यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. जिम्नॅस्टिक खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणी केली. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. या त्यांच्या कर्तबगारीमुळेच त्यांची पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे सांगली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.