सांगली : महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढविण्याची घोषणा नगरसेवक गौतम पवार यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केली. महापालिकेतील भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेला खाली खेचण्यासाठी भाजपसह इतर पक्षांशी युती करण्याचा पर्याय खुला असल्याचेही ते म्हणाले.
गत महापालिका निवडणूक स्वाभिमानी विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. पण यंदाच्या निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडीला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. मंगळवारी माजी आमदार संभाजी पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक नगरसेवक गौतम पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नगरसेवक शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळी, हेमंत खंडागळे यांच्यासह पवार समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पवार हे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात आरपीआय, मनसे, जनता दलासह विविध पक्ष एकत्रित आलो होतो. त्यानुसार ड्रेनेज, घरकुल, पाणी योजना यासह महापालिकेतील कारभारात सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आम्ही पदार्फाश केला. यासंदर्भात मुख्यमंत्री, लोकायुक्तांपर्यंत तसेच न्यायालयातूनही लढा उभारला. परंतु आताच्या निवडणुकीत प्रत्येकाच्या भूमिका बदलल्या आहेत.
भाजपच्या मर्यादा वाढल्या आहेत. जनता दल, आरपीआयसह विविध पक्षही वेगळ्या भूमिकेत दिसून येत आहेत. अशावेळी आमचे सर्व नगरसेवक, कार्यकर्त्यांनी ताकदीने शिवसेनेतूनच लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्कनेते गजानन कीर्तीकर यांच्यासमवेत काही दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यात त्यांनी पूर्ण ताकद देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, संघटक, प्रमुख कार्यकर्ते, तसेच नगरसेवक शेखर माने आदींसोबत बैठकही झाली. त्यानुसार सर्व ताकद एकत्र करून काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखणार आहोत. यामध्ये भाजप सोबत आल्यास त्यांच्याशीही युती करण्याचा आमचा प्रयत्न राहील. युतीबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून काय प्रतिसाद येतो, ते पाहून युतीचा निर्णय होईल, असेही पवार म्हणाले....तर विशाल पाटील यांचे सेनेत स्वागतमहापालिकेतील काँग्रेसच्या भ्रष्ट नगरसेवकांबद्दल वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी उघड भूमिका घेतली आहे. शिवसेना जी भूमिका मांडत आहे, तीच भूमिका आता तेही मांडत आहेत. गेल्या पाच वर्षांतही काँग्रेसमधील काहीजण राष्ट्रवादी-काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला चाप लावण्यासाठी आमच्याबरोबर होते. मग विशाल पाटील यांना तुम्ही बरोबर घेणार का? असे विचारताच पवार म्हणाले, ते जर शिवसेनेत येऊन या भ्रष्ट कारभाºयांविरुद्ध लढायला तयार असतील, तर त्यांचेही आम्ही स्वागतच करू.