सांगली : दिवाळीच्या काळात मिळणारी गावरान बोरं अलीकडे दिसेनाशी झाली आहेत. संकरित आणि मोठ्या आकारांच्या बोरांनी बाजारपेठ व्यापली आहे. मात्र गावरान बोरांची मजा यात नसल्याची खंत खवय्या ग्राहक व्यक्त करत आहेत. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यांत गावरान बोरांच्या बागा लांबवर पसरलेल्या असायच्या, त्यांची जागा आता डाळिंब, द्राक्षे आणि ॲपल बोरांनी घेतली आहे.उत्पादन घटले- यावर्षी बाजारात ॲपल बोरांचे प्रमाणही कमी आहे. किडीचा प्रादुर्भाव आणि कमी होणारे बागायत क्षेत्र यामुळे ही बोरेदेखील कमी झाली आहेत.- कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव तालुक्यात मोजक्याच क्षेत्रात ॲपल बोराची लागवड झाली आहे. पंधरवड्यापासून बोरे बाजारात येत आहेत.
किरकोळ विक्री ६० रुपये किलो- घाऊक बाजारात ३० ते ४० रुपये किलो या दराने ॲपल बोरांची विक्री केली जाते.- शेतकऱ्याकडून टनावर खरेदी करताना २२ ते २५ रुपये असा दर दलालांकडून दिला जातो.- किरकोळ बाजारात त्यांची ग्राहकांना विक्री ६० रुपये किलो या दराने केली जाते.
शेतकऱ्यांचा कल द्राक्ष, डाळिंबाकडे
ॲपल बोरांना गेल्यावर्षीपेक्षा किलोमागे सरासरी पाच रुपयांची दरवाढ मिळाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात मोजकेच शेतकरी ॲपल बोराचे उत्पन्न घेतात; मात्र लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे. - तानाजी आटपाडकर, ॲपल बोर उत्पादक, कोंगनोळी (ता.कवठेमहांकाळ)
डाळिंब आणि द्राक्ष बागायतीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. ॲपल बोरामध्ये उत्पन्न चांगले मिळत असतानाही शेतकऱ्यांचा कल नाही. सध्या हिरव्या आणि तांबूस रंगाच्या दोन जातींची लागवड केली आहे.किलोला ३० रुपये दर मिळण्याची अपेक्षा आहे. - जयसिंग मोहिते, शेतकरी, कवठेमहांकाळ