संतोष भिसे, आनंदा सुतार, लोकमत न्यूज नेटवर्क, वारणावती: मणदूर (ता. शिराळा) परिसरात गव्यांच्या कळपाने ग्रामस्थांची झोप उडवली आहे. सध्या परिसरात खरीप हंगामातील शेती कामांची लगबग सुरु झाली आहे. शेतकरी रानामाळात काम करण्यात व्यस्त आहेत. गव्यांचे कळप मानवी वस्तीत शिरकाव करत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गव्यांचा मानवी वस्तीतील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वारणावती वसाहतीत निर्मनुष्य झालेल्या पडक्या खोल्या व बाजूलाच असणाऱ्या ऊसाच्या फडात गव्यांनी तळ ठोकल्याचे बऱ्याच महिन्यांपासून गावकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. काही ग्रामस्थांनी कळपाला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत घालवण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु ते अयशस्वी ठरले. शनिवारी (दि.१८) सकाळी राम पाटील, शरद पाटील, अशोक सोनार, आनंदा बागडे, एन. के. कांबळे हे ग्रामस्थ फिरायला गेले असता एकाच वेळी अंदाजे १५ ते १६ सोळा गव्यांचा कळप नदीकडील बाजूने जुन्या आश्रमशाळेजवळून डोंगराच्या दिशेने जाताना दिसला. यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या ग्रामस्थांत घबराट निर्माण झाली आहे.
गव्यांनी परिसरातील ऊसासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याचबरोबर गव्यांचा मुक्तसंचार ग्रामस्थांच्या जीवावरही बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
गवे किती आणि कोठे थांबले आहेत?
वारणावती वसाहतीमध्ये सध्या वापराविना बंद अवस्थेत पडून असलेल्या रिकाम्या खोल्या आणि बाजुने वाढलेली काटेरी झुडपे तसेच शिवारातील ऊसाची शेती यामध्ये वन्य प्राण्यांनी नवीन अधिवास तयार केला आहे. पाणी पिण्यासाठी जवळच वारणा नदी असल्याने अन्न व पाण्याच्या शोधात गवे व अन्य प्राणी नागरी वसाहतीत येत आहेत. गव्यानी चांदोली राष्ट्रीय उद्यानातील आपला मूळचा अधिवास सोडून मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला आहे.