लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, जबरी चोरी असे दोन डझनभर गुन्हे दाखल असलेला मुळशी (जि. पुणे) येथील फरार गुंड संतोष ऊर्फ लब्ब्या चिंतामण चांदीलकर (वय ३६) याला पकडण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला (एलसीबी) बुधवारी मध्यरात्री यश आले. पाच महिन्यांपूर्वी त्याला येरवडा कारागृहात नेताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने पलायन केले होते. तो वाटेगाव (ता. वाळवा) येथे आश्रयाला असल्याची माहिती मिळताच ‘एलसीबी’ने त्यास पकडले.
संतोष चांदीलकर हा पुणे शहर, पुणे जिल्हा व सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील खतरनाक गुंड आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याला पुणे शहर पोलिसांनी अटक केली होती. एका खटल्याच्या सुनावणीसाठी त्याला पारगाव (ता. खंडाळा) न्यायालयात पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले होते. न्यायालयीन सुनावणीचे कामकाज आटोपल्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात नेले जात असताना, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने ‘सिने स्टाईल’ पलायन केले होते. याप्रकरणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना दोषी धरण्यात आले होते. त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी या पोलिसांवर खातेनिहाय कारवाईही झाली होती. हा तपास पुणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता.गेल्या पाच महिन्यांपासून पुणे शहर, कोथरूड पोलीस व गुन्हे अन्वेषणचे पथक चांदीलकरचा शोध घेत होते; पण त्याचा सुगावा लागत नव्हता.
तो इस्लामपूर परिसरात आश्रयाला असल्याची माहिती सांगलीच्या थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी रात्री मिळाली. या विभागाचे पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने मध्यरात्री इस्लामपूर परिसरात त्याचा शोध सुरू केला होता. तो वाटेगाव (ता. वाळवा) येथील शेतातील खोलीत लपून बसल्याचे समजताच पथकाने तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याला पकडल्याचे वृत्त समजताच पुण्यातील पिंपरी पोलिसांचे पथक गुरुवारी पहाटे सांगलीत दाखल झाले. त्याला घेऊन पथक पुण्याला रवाना झाले आहे.
२३ गुन्हे दाखलसंतोष चांदीलकरविरुद्ध खुनाचे तीन, खुनाच्या प्रयत्नाचे दोन, दरोड्याचे दोन, दरोड्याच्या तयारीतील दोन, जबरी चोरीचे ११, अपहरण व घरफोडीचा प्रत्येकी एक व महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रणचा (मोक्का) १ असे २३ गंभीर गुन्हे पुणे शहर, पुणे ग्रामीण व सातारा जिल्ह्यातील पौड, लोणिकंद, लोणावळा ग्रामीण, वालचंदनगर, कºहाड शहर पोलीस ठाण्यात नोंद आहेत.