सांगली : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन स्वरुपातच घेण्याचे गुरुवारी निश्चित झाले. त्याची पूर्वतयारी म्हणून शनिवारी सभेची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ही माहिती दिली.
सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. २१) आहे. यापूर्वीची सभा मार्चमध्ये प्रत्यक्ष सभागृहात झाली होती. यावेळची सभादेखील सभागृहातच घेण्याची मागणी काही सदस्यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने प्रयत्नही सुरु केले होते. पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा सल्ला दिला होता.
सध्या जिल्ह्यात दररोजची रुग्णसंख्या हजारपर्यंत असल्याने प्रत्यक्ष सभागृहात सभा शक्य नसल्याची भूमिका प्रशासनाने मांडली होती. त्यावर गुरुवारी निर्णायक चर्चा झाली. सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच घेण्याचे निश्चित करण्यात आले.अध्यक्षा कोरे यांनी सांगितले की, अनेक सदस्य, अधिकारी व कर्मचारी वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठीच ऑनलाईन सभेचा निर्णय घेतला. सभा प्रत्यक्ष सभागृहात व्हावी व सदस्यांच्या प्रत्येक प्रश्नाला साधकबाधक उत्तरे मिळावीत अशीच आमचीही भूमिका होती. पण दररोजची रुग्णसंख्या हजारपर्यंत असल्याने धोका पत्करणे शक्य नव्हते.सभेसाठी प्रत्येक सदस्याच्या गावात ग्रामपंचायतीत किंवा त्यांच्या घरात व्हिडीओ कॉन्फरन्सची सोय करणार आहोत. संबंधित ग्रामपंचायतीतील संग्राम कक्षाचा कर्मचारी तांत्रिक नियोजन करेल. याची रंगीत तालीम शनिवारी घेतली जाईल. प्रत्यक्ष सभेत सर्व सदस्यांचे समाधान होईपर्यंत कामकाज सुरुच ठेवले जाईल.