भिलवडी (जि. सांगली) : अनुवंशिक तपासणी करून जिनोमिकली सिलेक्टेड तंत्रज्ञानाद्वारे रेडी जन्मास घालण्याचा प्रयोग भिलवडी (जि. सांगली) येथील चितळे उद्योग समूहाच्या जिनस-एबीएस ग्लोबलच्या ‘ब्रह्मा’ या बुल सेंटरमध्ये यशस्वी झाला. येथील महाबली वळूपासून मुºहा म्हशीला कृत्रिम रेतनातून ‘दुर्गा’ ही रेडी शुक्रवारी जन्मास आली. हा जगातील पहिला प्रयोग असल्याचा दावा चितळे उद्योग समूहातर्फे करण्यात आला आहे.
चितळे जिनस आणि अमेरिकेतील एबीएस संस्थेच्या संयुक्त प्रकल्पाद्वारे उच्चतम उत्पादन क्षमता असलेल्या म्हशी कृत्रिम रेतनाद्वारे तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ‘ब्रह्मा’ असे या बुल सेंटरचे नाव असून, ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. अमेरिकेतून प्रथमच जिनोमिकली सिलेक्टेड वळू, भ्रूण तसेच जिवंत वळू भारतात आयात करण्यात आले असून, जगातील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ५० वळंूपैकी १२ वळू चितळे डेअरीच्या संशोधन केंद्रात आहेत.
‘ब्रह्मा’ या प्रकल्पात ३५ ते ४० लाख विर्याचे डोस बनवले जात आहेत. भारतासह श्रीलंका, व्हिएतनाम, आॅस्ट्रेलिया या देशात ते पाठवले जातात. भारतातील शेतकºयांना केवळ पंधराशे ते दोन हजार रुपये या दरात ते उपलब्ध करून दिले जातात.
या प्रकल्पात दर्जेदार व उच्चतम दर्जाच्या म्हशी आणि वळूंची पैदास निर्माण होत असल्याने दूध उत्पादकांसाठी ते क्रांतिकारक संशोधन आहे, असे अनंत चितळे यांनी सांगितले. जगात कृत्रिम रेतनापासून गार्इंची पैदास केली जात होती, पण प्रथमच कृत्रिम रेतनापासून म्हशींची पैदास करण्यात आली आहे. जन्माला आलेल्या ‘दुर्गा’ या रेडीप्रमाणे जन्मलेल्या इतर म्हशींपासून भविष्यात ३५०० ते ४००० लिटर दूध उत्पादन देणाºया म्हशी तयार होतील, असे काकासाहेब चितळे यांनी सांगितले.