सांगली : राज्यासह देशाच्या राजकीय, सामाजिक चळवळीवर आपली छाप पाडणारे जॉर्ज फर्नांडीस यांचे सांगली जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते राहिले. जनता दलाच्या प्रचारासह येथील एसटी कामगार संघाला बळ देण्यासाठी सातत्याने ते सांगलीच्या संपर्कात राहिले. येथील एसटी कामगार तसेच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणी हृदयात जपल्या आहेत.जॉर्ज फर्नांडीस यांनी सांगली व मिरजेत घेतलेल्या प्रचार सभा गाजल्या होत्या. सांगलीतील स्टेशन चौकात माजी आमदार संभाजी पवार यांच्या प्रचारासाठी ते १९८३ मध्ये आले होते, तर त्याचवेळी मिरजेत प्रा. शरद पाटील यांच्या प्रचारासाठी किसान चौकात त्यांनी सभा घेतली होती. मराठी भाषेत त्यांनी अत्यंत प्रभावी भाषणाच्या माध्यमातून येथील नागरिकांवर छाप पाडली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात जनता दलाची ताकद वाढविण्यात फर्नांडीस यांचाही मोठा वाटा होता. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला पहिला धक्का हा जनता दलाच्या माध्यमातूनच त्यावेळी दिला होता. सांगली, मिरजेत जनता दलाचे आमदार निवडून आल्यानंतर या पक्षाने जिल्हाभर मुसंडी मारण्याची तयारी केली होती. त्यासाठी ग्रामीण भागातील दौरे जॉर्ज फर्नांडीस यांनी केले होते.येथील एसटी कामगार भवनाच्या कोनशिला समारंभासाठी फेबु्रवारी १९८७ मध्ये आणि १९८८ मध्ये भवनाच्या उद्घाटनासाठी ते सांगलीत आले होते. एसटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कामगारांशी त्यांचा दीर्घकाळ संपर्क होता, अशी माहिती चंद्रकांत सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.त्यांचा साधेपणा सांगलीतील लोकांनाही भावला होता. जनता दलात असेपर्यंत प्रा. शरद पाटील, संभाजी पवार यांच्या संपर्कात सातत्याने ते होते. मुंबईतील बैठकांनाही ते आवर्जून सांगलीतील नेत्यांना बोलवायचे. सांगलीत त्यांनी अनेकदा भेटी दिल्या. येथील नेत्यांसह कार्यकर्ते, सामान्य नागरिकांशी ते संवाद साधत असत. भाजपशी जवळीक केल्यानंतर सांगलीतील नेत्यांशी त्यांचा संपर्क तुटला. सातत्याने सांगलीशी संपर्कात असणारे फर्नांडीस भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा सांगलीत कधी आले नाहीत.कामगारांच्या चळवळीप्रती दिलेले योगदान, आणीबाणीच्या काळातील लढा, पक्षासाठी केलेले कार्य यामुळे जॉर्ज फर्नांडीस यांनी संपूर्ण देशवासीयांच्या मनात घर केले. सांगलीशी त्यांचे चांगले नाते होते. माझ्या व संभाजी पवार यांच्या प्रचारासाठी ते येथे आले होते. त्यांच्या आठवणी आजही तशाच ताज्या आहेत. त्यांच्यातील साधेपणा आम्हाला भावला. देशासाठी, पक्षासाठी, गोरगरीब कामगारांसाठी त्यांनी केलेले कार्य हे इतिहासात कायमस्वरुपी नोंदले जाईल.- प्रा. शरद पाटील, प्रदेशाध्यक्ष, जनता दल
सांगलीशी जॉर्ज फर्नांडीस यांचे जिव्हाळ्याचे नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:42 PM