लाेकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : कृष्णा साखर कारखान्याच्या सभासदांनो, कुणाच्याही दबावाला न घाबरता बाहेर पडा व भ्रष्ट सत्ताधाऱ्यांचा पराभव करून रयत पॅनलला विजयी करा. कोणी कामावरून कमी करण्याची वल्गना करत असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यायला आम्ही खंबीर आहोत, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
ते कामेरी (ता. वाळवा) येथील रयत पॅनलच्या प्रचार सभेत बोलत होते. कदम म्हणाले की, कृष्णा सधन भागातील कारखाना असूनही शेजारच्या कारखान्यांबरोबर दर देऊ शकत नसेल तर असा भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना पायउतार करा. पाच वर्षामध्ये एकाही मृत सभासदाच्या वारसांना वारसाहक्काने सभासदत्व मंजूर केलेले नाही. परंतु, आम्ही मृत सभासदांच्या वारसांना त्यांचे हक्क व अधिकार देऊ. लोकनेते राजारामबापू पाटील आणि यशवंतराव मोहिते यांची सहकाराची चळवळ टिकवायची असेल तर रयत पॅनलला विजयी करा.
प्रास्ताविक रयत पॅनलचे उमेदवार प्रा. अनिल पाटील यांनी केले. यावेळी उमेदवार विवेकानंद मोरे, विश्वासराव मोरे-पाटील, आनंदराव मलगुंडे आणि सत्वशीला थोरात उपस्थित होते. डॉ. विश्वजित कदम व डॉ. जितेश कदम यांच्या हस्ते ग्रामदैवत भैरवनाथाला श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. कामेरी येथील काँग्रेसचे नेते रघुनाथ हळदे-पाटील यांनी रयत पॅनलला पाठिंबा दिल्याचे पत्र कदम यांच्याकडे दिले.
ज्येष्ठ सिनेकलाकार विलास रकटे, ॲड. देवानंद मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी छाया पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, माजी संचालक हणमंतराव पाटील, सरपंच स्वप्नाली जाधव, तानाजी माने, कृष्णा माळी, विलास बारपटे उपस्थित होते. सूत्रसंचालन हंबीरराव जडगे यांनी केले तर वैभव पाटील यांनी आभार मानले.