मिरज : मिरजेतील माणिकनगर येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या सहाजणांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाईस विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे.
माणिकनगर येथील समीर नासीर शेख (वय २८ रा. रेल्वे वसाहत माणिकनगर मिरज) याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दि. ३ डिसेंबर रोजी सहाजणांनी लोखंडी कोयत्याने शेख याच्यावर वार करून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी गांधी चाैक पोलिसांनी शौकत मेहबुब शेख (वय २१, रा. अमर टॉकिजसमोर खोजा झोपडपट्टी, मिरज), मोजेस रामचंद्र भंडारी (वय २२, रा. वानलेसवाडी, मिरज), भाग्यराज लुकस दारला (वय २१, रा. माणिकनगर, मिरज), प्रथमेश राजेश संकपाळ (वय २३, रा. अभयनगर, पाण्याच्या टाकीजवळ, संजयनगर, सांगली), आझाद सिकंदर पठाण (वय २१, रा. रेल्वे कोल्हापुर चाळ, मिरज), विकी विलास कलगुटगी (वय २४, रा. मंगळवार पेठ, मिरज) यांना अटक करून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार काबळे यांनी संबंधित सहाजणांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोकाअन्वये कारवाईस कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यांत येणार आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर करीत आहेत.