सांगली : कुपवाडमधील प्राथमिक शाळा व प्ले ग्राऊंडचे आरक्षण उठविण्यास सत्ताधारी भाजपने विरोध केला आहे. काँग्रेसनेही विरोधी भूमिका घेतली असली तरी, सदस्यांचे अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू आहे, तर राष्ट्रवादीने मात्र आरक्षण उठविण्याचे समर्थन केले. महापालिकेची महासभा आज होत आहे. या सभेत कुपवाड येथील प्राथमिक शाळा व प्ले-ग्राऊंडचे आरक्षण उठविण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सत्ताधारी भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीची पक्ष बैठक घेण्यात आली. सर्वपक्षीय कृती समितीने आरक्षणांचा बाजार रोखण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. यावरून तिन्ही पक्षांच्या पक्ष बैठकीत खल रंगला होता. भाजपच्या बैठकीत आरक्षण उठवण्यावरून पक्षाची बदनामी नको, असा पवित्रा घेतला. दुसरीकडे लोकांवरही अन्याय होऊ नये, यासाठी ज्यांच्या घरांवर आरक्षणे आहेत, त्यांच्या नावानिशी व जागेनिशी फेरप्रस्ताव आणण्याची महासभेत भूमिका घेण्याचे ठरले.
दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीची एकत्र बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीने आरक्षण उठविण्यास पाठिंब्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसमध्ये मात्र या प्रस्तावाला विरोध करण्याचा सूर होता; पण नगरसेवक संतोष पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीचीच री ओढल्याने इतर सदस्यांची कोंडी झाली. त्यामुळे या विषयावर खुली चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौकट
काय आहे प्रकरण
कुपवाडमध्ये दोन सर्व्हेमध्ये प्ले-ग्राऊंड व प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. एकूण सात एकर जागेवर हे आरक्षण आहे. या जागेवर गुंठेवारीअंतर्गत घरे बांधण्यात आली आहे. एकूण ४० ते ४५ गुंठे जागेवर घरे आहेत, तर ९५ गुंठे जागा मोकळी आहे. आरक्षण उठविल्यास संपूर्ण सर्व्हे नंबरवरील रद्द करावे लागणार आहे. २०१२ मध्ये हे आरक्षण रद्दचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. पण तो फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता पुन्हा विषय महासभेकडे मान्यतेसाठी आला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने भूमिका जाहीर करावी : बावडेकर
भाजपचे गटनेते युवराज बावडेकर म्हणाले, भाजपकडून कधीच महापालिकेच्या भूखंडांचा बाजार होणार नाही. कुपवाड येथील आरक्षण उठविण्याचा विषय राष्ट्रवादीचे विष्णू माने यांनी आणला होता. त्याला राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या काही सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. पण काँग्रेसच्या गटनेत्यांसह इतरांचा विरोध आहे. त्यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीने आधी आपली भूमिका जाहीर करावी, असे आव्हान दिले.