सांगली : देशात सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट केंद्रातील भाजप सरकारने घातला आहे. त्यामुळे आरक्षणाचा हक्कच हिरावून घेतला जाणार आहे. त्यासाठी विखुरलेल्या ओबीसी, भटके, मुस्लिम, दलित आदींनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन विरोध करूया, असे काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
ते म्हणाले की, गेल्या १५ ते २० वर्षात ओबीसी समाज, मुस्लिम, भटके, दलित समाज काँग्रेसपासून दुरावला आहे. देशात व राज्यात काँग्रेस पक्ष पिछाडीवर गेला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा निम्मा दौरा केला आहे. ओबीसींचे आरक्षण राजकीय क्षेत्रात कमी करण्यात आले असून, इतर विभागात ते कायम आहे. ओबीसींची सामाजिक अवस्था, शैक्षणिक अवस्था, किती आरक्षण आवश्यक आदींचा अभ्यास करून आरक्षण दिले जाणार आहे. राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन अनेक सवलती दिल्या आहेत. त्याचे स्वागत करतो. परंतु दुसरीकडे ओबीसींसाठीच्या महाज्योती योजनेसाठी बजेट तोकडे पडत आहे. त्यासाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्याची गरज आहे.
आरक्षणाची मागणी सर्वजण करत आहेत. परंतु मुळात आरक्षण आहे कोठे, हादेखील प्रश्न आहे. देशात सर्वत्र खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट मोदींनी घातला आहे. आरएसएसने मोदींच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. अशावेळी मूळ काँग्रेस पुन्हा उभी राहण्याची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी लोकसभेत निर्णय घेणे आवश्यक आहे. ५० टक्केच्यावर आरक्षण नेऊन ठेवले तर सर्वांनाच आरक्षण मिळेल. आंदोलन करण्याची गरजच भासणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी बाळासाहेब गुरव, अशोक रजपूत, तुकाराम माळी आदी उपस्थित होते.