जालिंदर शिंदे -- घाटनांद्रे--कवठेमहांकाळ तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, रायवाडी, केरेवाडी व शेळकेवाडी या गावांच्या शेतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या कृष्णा खोरे योजनेंतर्गत टेंभू योजनेतील मंजूर घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजना केवळ कागदावरच राहिली आहे. या योजनेकडे लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असून, ही योजना कधी सुरू होणार, असा सवाल घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील दुष्काळ कायमचाच हटावा म्हणून माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नांनी घाटमाथ्यावरील या गावांचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी टेंभू योजनेंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेची निर्मिती करण्यात आली. या योजनेमुळे ८७२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. टेंभू योजनेच्या बाणूरगड बोगद्यानंतर कवठेमहांकाळ कालव्यावर पंपगृह बांधून ते पाणी तीन टप्प्यात उचलण्याचे नियोजन आहे. पण या कामाला प्रारंभ होण्यापूर्वीच आर. आर. (आबा) पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या योजनेसाठी जागेचे सर्वेक्षण करणे गरजेचे होते. पण अद्याप सर्वेक्षण झालेले नाही. यासंदर्भात टेंभू योजनेच्या कार्यकारी अभियंत्याकडे विचारणा केली असता, सर्वेक्षणासाठी निविदा मागवतो, खासगी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची तोंडी उत्तरे देण्यात येतात. तसेच कालांतराने या योजनेसाठी निधीच उपलब्ध नसल्याने सर्वेक्षण करता येत नाही, अशी टोलवा-टोलवीची उत्तरे शेतकऱ्यांना मिळतात.दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत असतानाही नेते फक्त निधीची घोषणाच करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागज परिसर व टेंभू योजनेच्या कामाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी योजनेसाठी ५0 हजार कोटींची घोषणा के ली. परंतु घोषणा करून दोन-तीन महिने झाले तरी, त्यातील एक दमडीही उपलब्ध झालेली नाही. तसेच काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेवाडी येथे शेतकऱ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविली.त्यामुळे त्यांचा दौराही केवळ फुसका बारच ठरला. या भागाकडे सर्वच बाजूने दुर्लक्ष होत असल्याने, राजकारणविरहीत लढा उभारण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.राजकारणविरहीत लढा कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळ हटावा म्हणून माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नांनी घाटमाथ्यावरील गावांचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी टेंभू योजनेंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेची निर्मिती करण्यात आली. मात्र नंतर याकडे दुर्लक्ष झाले. कृष्णा खोरे अंतर्गत टेंभू योजनेतील या मजूर घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजना केवळ कागदावर असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या योजनेसाठी निधी उपलब्ध करावा अन्यथा लाभधारक शेतकरी जत, उमदी शेतकऱ्यांच्या धर्तीवर राजकारणविरहीत लढा उभा करणार आहेत, अशी माहिती कॉँग्रेसचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.
‘घाटनांदे्र’ योजना फक्त कागदावरच
By admin | Published: December 02, 2015 12:06 AM