लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, पॅनलप्रमुखांना घाटमाथ्यावरच्या मतदारांवर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. खानापूर व कडेगाव या दोन्ही तालुक्यातील २३ गावांतील २६०० सभासद मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत.
पूर्वी घाटमाथ्यासाठी हा एकच कारखाना असल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस या कारखान्याकडे पाठविण्याशिवाय पर्याय नव्हता. पूर्वीच्या खानापूर व विभाजनानंतर कडेगाव या दोन्ही तालुक्यातील २३ गावांतील शेतकरी आजही ‘कृष्णा’चे सभासद आहेत.
खानापूर तालुक्यातील भाळवणी, बलवडी (भा.) व कमळापूर ही तीन गावे तर कडेगाव तालुक्यातील नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, खंबाळे (औंध), तडसर, सोनसळ, शिरसगाव, सोनकिरे, आसद, चिंचणी (अं.), पाडळी, मोहित्यांचे वडगाव, देवराष्ट्रे, शिरगाव, वांगी, हिंगणगाव खुर्द, शेळकबाव, कुंभारगाव, अंबक, रामापूर अशा २३ गावांत २६०० मतदार आहेत.
ही गावे तीन गटात विभागली गेली आहेत. नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, खंबाळे (औंध), तडसर ही पाच गावे वडगाव हवेली-शेरे गटात, सोनसळ, शिरसगाव, सोनकिरे ही तीन गावे रेठरे बुद्रुक गटात आणि उर्वरित आसदपासून ते हिंगणगाव खुर्दपर्यंतची १५ गावे ही येडेमच्छिंद्र-वांगी या गटात समाविष्ट आहेत. घाटमाथ्यावरील मतदारांवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही विशेष लक्ष असते.
चौकट
घाटमाथ्यावर तीन विद्यमान संचालक
खानापूर व कडेगाव या दोन तालुक्यात सध्या तीन विद्यमान संचालक आहेत. मोहित्यांचे वडगाव येथील पांडुरंग दत्तू मोहिते हे अविनाश मोहिते पॅनलमधून सलग दोन वेळा संचालक झाले आहेत. सत्ताधारी भोसले गटातून चिंचणी (अं.) येथील पांडुरंग होनमाने व वांगी येथील ब्रिजराज मोहिते गत निवडणुकीत विजयी झाले होते.