इस्लामपूर : इस्लामपूरच्या वैद्यकीय सेवेमध्ये डॉ. एन. टी. घट्टे परिवाराने मोलाचे योगदान दिले आहे. पन्नास वर्षांच्या अविरत सेवेमधून त्यांनी या शहराचा लौकिक वाढवला आहे. सामाजिक बांधीलकी जपत त्यांनी घेतलेल्या मूत्ररोग निदान व उपचार शिबिराचा रुग्णांना लाभ होईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मूत्ररोग निदान व उपचार शिबिर झाले. याचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रा. शामराव पाटील, पी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जस्मितसिंग, सुनील जावळे, श्रद्धा लोहिया, अमेय पाटील, पवन रहांगडाले, ॲलन थॉमस, सुनील चव्हाण या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
पुण्याचे सहायक पोलीस आयुक्त मितेश घट्टे म्हणाले, वाळवा तालुक्यात सुरू होणारे उपक्रम राज्याच्या पातळीवर पोहोचतात. यापुढे आरोग्याला महत्त्व देण्याची गरज आहे.
यावेळी जयंतरावांच्या आग्रहावरून मीना घट्टे म्हणाल्या, डॉक्टरांनी कुटुंबापेक्षा जनसेवेला अधिक महत्त्व दिले. या कामातून त्यांनी जो लौकिक मिळवला आहे, त्याचा अभिमान वाटतो.
डॉ. एन. टी. घट्टे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या दीपा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मनीष घट्टे यांनी आभार मानले.
सेवेचा गौरव
डॉ. एन. टी. घट्टे यांचा अमृतमहोत्सव, लग्नाची ५० वर्षे आणि अविरत वैद्यकीय सेवेची ५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल जयंत पाटील यांच्याहस्ते उभयतांचा सत्कार करण्यात आला.
फोटो-