दत्ता पाटील ।तासगाव : फळबागांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना विमा कंपन्यांच्या जाचक अटी आणि निकषांमुळे कुचकामी ठरत आहे. अवकाळी, गारपिटीने सातत्याने द्राक्षबागांचे नुकसान होत आहे. मात्र निकषांत बसत नसल्याने विम्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करूनदेखील मोबदला मिळत नाही.
तीन दिवसांपासून तासगाव तालुक्यात गारपिटीने येळावी, विसापूर, आरवडेसह अनेक गावांत द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीने झोडपल्यामुळे दुसºयांदा खरड छाटणी घ्यावी लागली आहे, तर अनेक ठिकाणी द्राक्षवेलींना फळधारणेची शाश्वती धूसर आहे.
गतवर्षीही फळ छाटणीनंतर अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले होते. शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनीही बोरगाव येथे नुकसानग्रस्त बागांची पाहणी केली होती. कर्ज असणाºया द्राक्षबागांना पीक विमा सक्तीचा आहे, तर कर्ज नसणाºया द्राक्ष बागायतदारांनीही पीक विमा घेतलेला आहे. हवामान आधारित पीक विमा घेण्यासाठी शेतकºयांनी लाखो रुपये खर्ची टाकले आहेत. एकट्या जिल्हा बँकेत ९३२ कर्जदार, तर २९ बिगर कर्जदारांनी पीक छाटणीच्या काळातील अवकाळी विमा घेतला आहे, तर १५३ शेतकºयांनी गारपिटीच्या कालावधीसाठीचा पीक विमा घेतला आहे.
या विम्यासाठी द्राक्ष बागायतदारांना तब्बल ६८ लाख ७४ हजार १२८ रुपये भुर्दंड बसला आहे. ही रक्कम केवळ जिल्हा बँकेशी संबंधित आणि एका वर्षाची आहे.विमा कंपन्यांकडून अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी १६ आॅक्टोबर ते ३१ मार्च हा कालावधी आहे, तर गारपिटीसाठी १ जानेवारी ते ३० एप्रिल हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र आता होत असलेली गारपीटविमा कंपनीची मुदत संपल्यानंतर होत आहे. या गारपिटीच्या नुकसानीला विमा लागू होत नाही. गतवर्षी अवकाळीचा पाऊस आॅक्टोबरपूर्वी झाला होता. त्यामुळे द्राक्षबागांचे कोट्यवधीचे नुकसान होऊनदेखील भरपाई मिळाली नाही.हवामानाचा निकष फोलगेल्यावर्षी बोरगाव (ता. तासगाव) येथे रस्त्याच्या एका बाजूला अवकाळीचा जोरदार पाऊस झाला होता, तर दुसºया बाजूला पाऊसच झाला नाही. दोन दिवसांपूर्वी येळावीतही काही भागात गारपिटीचा तडाखा बसला, तर काही भागात गारपीट झाली नाही. मात्र विमा कंपन्यांचा निकष हवामानआधारित आणि हवामान केंद्रांशी निगडित आहे. परिणामी नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून भरपाईसाठी हात वर केले जात आहेत.
हवामानआधारित पीक विमा योजनेत अनेक जाचक अटी आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने द्राक्षासह अन्य फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र निकषांत बसत नसल्यामुळे लाखो रुपये पीक विम्यासाठी भरुनदेखील कवडीचीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. पीक विम्याचा कालावधी न पाहता, वर्षभर पीक विमा लागू करावा, अशी मागणी यापूर्वीच केली आहे.- अर्जुन पाटील, जिल्हा परिषद सदस्य