अविनाश कोळीसांगली : दुडुदुडु धावत पोर बाहेर गेली..अन् एका शोषखड्ड्याने तिचे आयुष्य क्षणात शोषले..कुटुंबीयांच्या कावऱ्या-बावऱ्या नजरा थकतात अन् सांडपाण्यातला मृतदेह पाहून त्यांचे काळीज चिरते. तरीही हृदयशून्य व्यवस्थेचा दगड हलत नाही. सहा महिन्यापूर्वी मंजूर झालेली गटार बांधली गेली असती तर आज चिमुकली तहुरा जिवंत असती. आता तिच्या पश्चात शोषखड्डा भरला जाईल अन् गटारही होईल, पण तहुराच्या आई-वडिलांच्या काळजाला पडलेला खड्डा कसा भरून निघणार, असा सवाल समाजमनाला सतावत आहे.शामरावनगरमधील ज्ञानेश्वर काॅलनीतील शनिवारची दुर्घटना या परिसरातील लोकांच्या जगण्या-मरण्याची वेदनादायी कहाणी दर्शविते. तहुरा राजू मुलाणी या पावणे दोन वर्षाच्या मुलीचा शोषखड्ड्यात बुडून मृत्यू झाला. चोवीस तास उलटले तरी या भागात ना नगरसेवक फिरकले, ना महापालिकेचे अधिकारी. रविवारी दिवसभर मुलाणी कुटुंबीयांच्या घरात आक्रोश, वेदनांचे वादळ फिरत होते. तर कॉलनीत अस्वस्थ शांतता पसरली होती.
हे काम वेळेत झाले असते तर..?महापालिकेने २१ जुलै २०२३ रोजी याच कॉलनीतील गटारीचे ९ लाख ९७ हजार रुपयांचे काम मंजूर केले. ज्या शोषखड्ड्याने बळी घेतला त्याच ठिकाणाहून आरसीसी गटार होणार होती. हे काम अद्याप रेंगाळले आहे. त्याचवेळी हे काम पूर्ण झाले असते तर आज तहुरा जिवंत असती, असे मत येथील नागरिकांनी मांडले.
आजही शोषखड्डा तसाचचोवीस तास उलटल्यानंतरही हा शोषखड्डा रविवारीही तसाच उघडा होता. या खड्ड्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करायचा का, असा सवाल तहुराचे काका अस्लम मुलाणी यांनी उपस्थित केला.
सहा मुले शोषखड्ड्यात पडलीयाच घराजवळ चार ठिकाणी शोषखड्डे आहेत. ते उघडेच असल्याने लहान मुले पडण्याच्या घटना वारंवार घडताहेत. गेल्या वर्षभरात तहुरा नावाची आणखी एक मुलगी तसेच तनू चौगुले, अरफिन महात आदी सहा बालके या शोषखड्ड्यात पडली, पण त्यांना कुणी ना कुणी वाचविले. तहुरा मुलाणीचा मात्र, बळी गेला.
पोटात एक बाळ अन् दुसऱ्याचा बळीतहुराची आई सध्या गर्भवती आहे. नव्या बाळाच्या येण्याची उत्सुकता व आनंद घरात असतानाच लळा लागलेल्या दुसऱ्या बाळाने मात्र, जग सोडले. त्यामुळे आनंदी घरात आई अन् तिचे सारे कुटुंबीय वेदनांनी घायाळ झाले आहेत.
गटारीसाठी भांडणाऱ्या कुटुंबाच्या पदरातच वेदनागेल्या अनेक वर्षांपासून गटारीसाठी झालेल्या आंदोलनात मुलाणी कुटुंब अग्रभागी होते. आंदोलनाला यश आले नाही, पण याच प्रश्नाने त्यांच्या घरातील चिमुकलीचा बळी घेतला अन् त्यांच्या पदरी वेदना वाट्याला आल्या.