तासगाव : तासगाव येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनासाठी नेमण्यात आलेल्या एका सुरक्षारक्षकाने व एका स्वच्छता कर्मचाऱ्याने प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी रस्ता अडवून छेडछाड काढणाऱ्या सुरक्षारक्षकाला ताब्यात घेण्यासाठी गदारोळ केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने अनुचित प्रकार टळला.तासगाव येथे चार दिवसांपासून कृषी प्रदर्शन सुरू आहे. मंगळवारी या प्रदर्शनाचा पाचवा दिवस होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास तासगाव शहरातील एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणींसह हे कृषी प्रदर्शन पाहायला गेली होती. पाहून बाहेर येत असताना तेथे नेमण्यात आलेल्या एका सुरक्षारक्षकाने व तेथील स्वच्छता कर्मचाऱ्याने या मुलीची छेड काढली. संबंधित मुलीने तात्काळ हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर संबंधित पालक व त्या परिसरातील तरुणांनी या प्रदर्शनात धाव घेतली.तरुणांनी रस्ता अडवून छेडछाड केलेल्या सुरक्षारक्षकास ताब्यात देण्याची मागणी संयोजकांकडे केली. यावेळी मोठा गदारोळ सुरू झाला. मात्र, यावेळी संबंधित तरुण काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यानंतर या तरुणांनी प्रदर्शनाच्या संयोजकांना बोलावून छेड काढणाऱ्या तरुणांना आमच्यासमोर आणा अन्यथा आम्ही प्रदर्शनात घुसून धिंगाणा घालू, अशी दमबाजी केली. यावेळी या ठिकाणचे वातावरण गंभीर झाले होते.काही वेळाने हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ काही अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी छेड काढणाऱ्या तरुणांना पोलिस बंदोबस्तात पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर प्रदर्शन स्थळावरील तणाव निवळला.
Sangli: तासगावात तरुणीची सुरक्षा रक्षकाकडूनच छेडछाड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 5:53 PM