शिराळा : मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीचे व तिच्या आईचे घरी आगळेवेगळे स्वागत करण्यात आले. स्वागतावेळी फुलांचा गालिचा, स्वागत फलक, मुलांना खाऊवाटप अशी जंगी तयारी करण्यात आली होती. शिराळ्यासारख्या डोंगरी भागातील महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सुजाता इंगवले यांनी नातीच्या जन्माच्या स्वागतोत्सवातून वेगळा आदर्श घालून दिला आहे.
महिला व बालकल्याण सभापती सौ. सुजाता महादेव इंगवले यांच्या सुनेने-प्रियांका यांनी-चार महिन्यांपूर्वी इचलकरंजी येथील माहेरी मुलीला जन्म दिला. तिचे नामकरण झाले आणि अन्वी हे नाव ठेवण्यात आले. रविवार, दि. ५ रोजी नातीला चार महिने पूर्ण झाल्यानंतर शिराळा येथे आणण्यात आले. यावेळी अन्वीच्या स्वागतासाठी घरापासून चाळीस ते पन्नास फूट फुलांचा गालिचा तयार करण्यात आला होता.
स्वागताचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते. वीस-पंचवीस लहान मुलांसमवेत तिला घरी आणण्यात आले. तांदूळ भरलेला कलश ओलांडून तसेच कुंकवाच्या पावलांनी अन्वीचा गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी सर्व लहानग्यांना खाऊ वाटण्यात आला.सर्वत्र कौतुकअन्वीच्या स्वागतावेळी परिसरातील अबाल-वृद्ध उपस्थित होते. मुलगीसुद्धा वारसदार असून, तिलाही मुलासारखेच प्रेम द्या, असा संदेश या आगळ्यावेगळ्या स्वागतातून दिला गेला. त्याचे परिसरातील लोकांमधून कौतुक होत आहे.