सांगली/भिलवडी : माळवाडी (ता. पलूस) येथील चौदावर्षीय शाळकरी मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला. शुक्रवारी सकाळी साडेआठला ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण व भिलवडी पोलिसांनी भिलवडी, माळवाडी, अंकलखोप येथे छापे टाकून सायंकाळपर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या नावांबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. आज, शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ कृष्णाकाठच्या गावात बंद पुकारण्यात येणार असून, भिलवडीतून मूक मोर्चाही काढला जाणार आहे.पीडित मृत मुलगी आई व बहिणीसोबत माळवाडीतील चव्हाण प्लॉट परिसरात राहत होती. दहा वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. ती जवळच भिलवडी येथील सेकंडरी स्कूलमध्ये आठवीत शिकत होती. तिची आई सूतगिरणीत नोकरीस आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. गुरुवारी रात्री तिचा आईशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादातून ती साडेआठ वाजता घरातून बाहेर पडली होती. रात्रीचे दहा वाजले तरी ती घरी आली नव्हती. त्यामुळे आईने परिसरात जाऊन तिचा शोध घेतला. तिच्या मैत्रिणींकडेही चौकशी केली, तथापि तिला कोणीच पाहिले नसल्याचे सांगण्यात आले. आई रात्रभर तिची प्रतीक्षा करत बसली होती, पण ती घरी परतलीच नाही. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता भिलवडी-तासगाव रस्त्यावरील धान्य गोदामाजवळ या मुलीचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती भिलवडी पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. माळवाडीतील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय, उपअधीक्षक वैशाली शिंदे, उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील, गुंडाविरोधी पथकाचे निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाजवळ संशयास्पद काहीच सापडले नाही. तिचा बलात्कार करून खून केल्याचा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी बांधला. तशा महत्त्वाच्या खुणा पंचनामा करताना आढळून आल्या. परंतु शवविच्छेदन केल्यानंतरच खरे कारण पुढे येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मृतदेह विच्छेदन तपासणीसाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत न्यायवैद्यक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विच्छेदन तपासणी सुरू होती. (प्रतिनिधी/वार्ताहर)गावे बंद; आज मोर्चाया घटनेच्या निषेधार्थ भिलवडी, माळवाडी, अंकलखोप आदी कृष्णाकाठच्या गावांत शनिवारी बंद पुकारण्यात आला आहे. भिलवडीत सकाळी नऊ वाजता मूक निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पोलिसांनी सखोल तपास करावा : पतंगराव कदममाळवाडीत शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया आ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. या घटनेचा निषेध करून ते म्हणाले की, जिल्हा पोलिस प्रमुखांशी दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास करावा, संशयितांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सामूहिक बलात्कार करून मुलीचा खून
By admin | Published: January 06, 2017 11:50 PM