शृंगारतळी : जिल्हा पोलीस प्रशासनाने महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाटपन्हाळे महाविद्यालयात राबवलेल्या तक्रारपेटी उपक्रमामुळे शिक्षक व पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे़रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. अशीच एक पेटी पाटपन्हाळेतील महाविद्यालयात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई न करता अपप्रवृत्तीना जरब बसवण्याचे यशस्वी काम गुहागर पोलिसांनी केले आहे.महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे चांगले पाऊल असल्याचे पालकांमधून बोलले जात आहे. काहीवेळा महिला व मुलींना एखाद्याकडून त्रास झाला तरी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार द्यावी लागते. मात्र, तक्रार देण्याचे धाडस होत नव्हते. त्यामुळे पोलिसांपर्यंत विषय जात नव्हता. मात्र, आता पोलीस प्रशासनाने स्वत:हून महाविद्यालयात तक्रारपेटी उपलब्ध करून दिल्याने महिलांच्या मदतीला पोलीस प्रशासन उभे असल्याचा संदेश गुहागर पोलिसांनी दिला आहे.गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात याच प्रकारची तक्रारपेटी लावण्यात आली आहे. वेळोवेळी पोलीस पेटी तपासून जातात. हा उपक्रम सर्वांच्या दृष्टीने चांगला असल्याचे मुख्याध्यापक प्रकाश बापट यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)
पाटपन्हाळेत मुली, महिलांसाठी तक्रारपेटी
By admin | Published: July 17, 2014 11:46 PM