सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अद्यापही कायम आहे. या कालावधीत कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना व एक पालक गमावलेल्या बालकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्व यंत्रणांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना पाच लाख रुपये रकमेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बालसंरक्षण हक्क समितीची आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश विश्वास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, जिल्ह्यामध्ये काेरोनामुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या अशा एकूण ६९९ बालकांची प्राथमिक यादी तयार असून, त्यापैकी ३९६ बालकांची नावे पोर्टलवर अद्ययावत केली आहेत. उर्वरित बालकांची संपूर्ण माहिती गृह चौकशी करून पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावी. ३९६ बालकांपैकी २३१ बालके ही शाळेत जाणारी असून, त्या बालकांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत.
यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. सुचेता मलवाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.
चौकट
कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवा महिलांची संख्या १९३ असून, यांसह संपूर्ण यादी अद्ययावत करून सर्वांना शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.