मिरज : वीस वर्षांनंतर महापालिकेत आता एकदा भाजपला संधी द्या. भाजपचा महापौर झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत डॉक्टर्स, वकील, अभियंते व उद्योजकांच्या बैठकीत दिले. सुशिक्षित मंडळी मतदान करीत नसल्याने वाईट व्यक्ती निवडून येतात, हे लोकशाहीला घातक असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
महसूलमंत्री पाटील म्हणाले की, यापूर्वीच्या राज्यकर्ते सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याने बुध्दिजीवी मंडळींना राजकारण्यांबद्दल चिड आहे. पंतप्रधान मोदी यांनी राज्यकर्ता प्रामाणिक असतो, असा विश्वास निर्माण केला आहे. चांगली व्यक्ती निवडून देणे सामाजिक काम असून, बुध्दिजीवी मंडळींनी या निवडणुकीत मतदानापासून दूर राहू नये, असेही आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
याप्रसंगी अॅड. राजू शिरसाट, डॉ. मोहन पटवर्धन, श्रीशैल जयगोंड, रवींद्र फडके, शंकर परदेशी, महेंद्र गाडे यांनी शहरातील रस्ते, क्रीडांगण, सांडपाणी यासह विविध समस्या सांगितल्या. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. आ. सुरेश खाडे यांनी महापालिकेत काँग्रेसची सत्ता असतानाही भाजप शासनाने शहराच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणात निधी दिल्याचे सांगितले.
दीपक शिंदे, मकरंद देशपांडे, डॉ. रवींद्र आरळी, नगरसेविका संगीता खोत, विवेक कांबळे, आनंदा देवमाने, गायत्री कुळ्ळोळी, गणेश माळी, अॅड. वासुदेव ठाणेदार, अॅड. किरण जाबशेट्टी, अॅड. किरण जाधव, शशांक जाधव, वागेश जाधव, रमेश पवार, तानाजी ओमासे, सुभाष मिश्रा, ओंकार शुक्ल, श्रीधर पटवर्धन उपस्थित होते.सांगली-मिरजेच्या समस्या सोडवूचंद्रकांत पाटील म्हणाले, सुशिक्षित मंडळी निवडणूक मतदानापासून दूर राहत असल्याने वाईट प्रवृत्तींना संधी मिळते. काँग्रेसमुळे शहराचा विकास खुंटला आहे. यावेळी भाजपला संधी द्या. भाजपचा महापौर झाल्यानंतर महिन्यातून दोनवेळा सांगली, मिरजेस भेट देऊन समस्या सोडवू.