लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नियोजित भुयारी गटारीचे काम ठप्प आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि विविध समस्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या प्रभागनिहाय बैठकीत मांडल्या. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी, रस्त्यांचे बजेट दया, शासनाकडून फंड देतो, असे आदेश मुख्याधिकारी अरविंद माळी यांना दिले.
राज्यात महाआघाडीची सत्ता स्थापनेत जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली. आज त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्षासह मंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे इस्लामपुरातील विकासाकडे दुर्लक्ष झाले. त्यातच इस्लामपूर पालिकेत सत्ता नाही. तेही महत्त्वाचे कारण आहे. वर्षभरात इस्लामपुरातील जनतेला भेटणे शक्य झाले नाही. त्यामुळे गेले दोन दिवस मंत्री पाटील यांनी प्रभागनिहाय बैठका घेतल्या.
यामध्ये सत्ताधारी विकास आघाडीने विकासाची बिघाडी कशी केली, त्याचा पाढाच नागरिकांनी वाचला. यावर, बजेट सादर करा, निधी देण्याचा प्रयत्न करू, असे आदेश मंत्री पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिले.
पालिकेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ३० वर्षे असलेली सत्ता उलथून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत किंगमेकर झाले. याचे श्रेयही लाटले. पालिकेच्या कारभारात लक्ष घातले. यामध्ये राष्ट्रवादीमधील काही गद्दार नगरसेवक सामील होते. या कारभारात श्रेयवाद नडला. दोन वर्षातच खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात दरी पडली. याअंतर्गत वादावर जयंत पाटील लक्ष ठेवून होते. आता राज्यात महाआघाडीची सत्ता आली. त्यांची वर्षपूर्ती झाली. आता फक्त आगामी पालिका निवडणुकीत विकास आघाडीचा कर्यक्रमच, या पार्श्वभूमीवर इस्लामपुरात जयंत पाटील यांनी बैठका सुरू केल्या आहेत.
चौकट
३७ बुथवर बैठका
शहरात एकूण राष्ट्रवादीचे ५७ बुथ आहेत. यापैकी दोन दिवसात ३७ बुथवर त्यांनी बैठका घेतल्या. याचे नियोजन माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, शहर अध्यक्ष शहाजी पाटील, डॉ. संग्राम पाटील, रोझा किणीकर आणि संबंधित प्रभागातील नगरसेवक करतात. या बैठकीस तहसीलदार रवींद्र सबनीस, मुख्याधिकारी अरविंद माळी हे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
फोटो - जयंत पाटील यांचा सिंगल फोटो व नगरपालिका लोगो