सांगली : वीज कर्मचाऱ्यांना फ्रण्टलाइन वर्कर्स समजून त्यांनाही कोरोनाची लस देण्याची मागणी करण्यात आली आहे. वीज कंपनीचे अभियंते, वायरमन, प्रशासकीय कर्मचारी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्राधान्याने द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
शासनाला पाठविलेल्या निवेदनात कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे की, कोरोना काळात गेल्या एक-दीड वर्षांपासून वीज कंपनीचे सर्व कर्मचारी अखंड रस्त्यावर आहेत. लॉकडाऊनमध्ये सर्व नागरिक घरात बसलेले असताना वीज कर्मचारी मात्र रस्त्यावर राहिले. वीज पुरवठा अखंडित ठेवला. या काळात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, काहींचा बळीही गेला. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांनाच मिळत आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनाही ती द्यावी. त्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना फ्रण्टलाइन वर्कर्स समजले जावे. वयाची अट न घालता सर्वच कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिरे घ्यावीत.