सांगली : महापालिकेंतर्गत काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्या व गटप्रवर्तकांना कोविड प्रोत्साहन भत्ता तातडीने देण्याची मागणी लाल बावटा आशा व गट प्रवर्तक युनियनने केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भत्ता देण्याचा ठराव एप्रिलच्या महासभेत झाला होता; पण त्याच महिन्यापासून भत्ता दिला नाही. जूनपासून सुरू करण्यात आला. तोदेखील अद्याप मिळालेला नाही. आरोग्य अधिकाऱ्यांनी एका परिपत्रकाद्वारे आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकाऱ्यांनी आशांच्या कोविड कामाचा अहवाल दिल्यावरच प्रोत्साहन भत्ता अदा करणार असल्याचे सांगितले आहे. तसा अहवाल आरोग्य केंद्रांकडून देण्यात आलेला नाही, त्यामुळे भत्ते अडवण्यात आले आहेत.
आशा व गटप्रवर्तकांनी दीड वर्षापासून कोविड काळात जिवाची बाजी लावून काम केले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने कोविड भत्ता मिळणे गरजेचे आहे. तो प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जमा करावा. जूनचा भत्ता दोन दिवसांत मिळाला नाही तर महापालिकेसमोर बेमुदत आंदोलन करावे लागेल.