कडेगाव : शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून पलूस-कडेगाव तालुक्याला जाणीवपूर्वक वगळले आहे. आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यावर पलूस तालुक्यातील पलूस व भिलवडी तसेच कडेगाव तालुक्यातील नेवरी मंडलामधील गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु दोन्ही तालुक्यांमध्ये संपूर्ण दुष्काळ जाहीर करा, अशी आमची मागणी आहे. या दोन्ही तालुक्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
पलूस व कडेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी काँग्रेस पक्षातर्फे विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयावर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार मोहनराव कदम, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी भाजप सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांना दुष्काळप्रश्नी निवेदन देण्यात आले.
यावेळी विश्वजित कदम म्हणाले, पलूस व कडेगा या दोन्ही तालुक्यांमध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबतची वस्तुस्थिती समोर दिसत असतानाही या दोन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळ नाकारण्याचे पाप भाजप सरकार करीत आहे. सरकारला जाग आणून दोन्ही तालुक्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद आमच्या मनगटात आहे. प्रशासनाने तांत्रिक चुकांची दुरुस्ती करून फेरअहवाल सादर करावा व दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, तसेच याप्रश्नी विधानसभेत सरकारला जाब विचारू, असा इशारा कदम यांनी दिला.
यावेळी काँग्रेसचे पलूस तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील, शिवाजीराव पवार, बाळकृष्ण यादव, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव मोहिते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाविरोधात आक्रमक भाषणे केली. यावेळी सोनहिरा कारखान्याचे संचालक पी. सी. जाधव, पंढरीनाथ घाडगे, ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ, कडेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष साजिद पाटील, माजी सरपंच विजय शिंदे, सुनील जगदाळे, विजय मोहिते, सुनील पाटील, महेश कदम, नगरसेवक दिनकर जाधव, सागर सूर्यवंशी, सुनील पवार, राहुल पाटील यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पलूस-कडेगावकडे शासनाची वक्रदृष्टीयावेळी पलूस तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील म्हणाले की, राज्य शासनाने पलूस-कडेगाव तालुक्याला दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळले आहे. यावरूनच शासनाची या तालुक्यांवरील वक्रदृष्टी दिसते, परंतु पलूस-कडेगाव तालुका कोणापुढे मान झुकवणार नाही. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध संघर्षच करेल.पलूस व कडेगाव तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पलूस तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील, पृथ्वीराज चव्हाण, भीमराव मोहिते उपस्थित होते.