शिरढोण : कवठेमहांकाळच्या विकासाचे आमिष दाखवून शहर लुटण्यासाठी एकत्र आलेल्या अभद्र युतीला नगरपंचायत निवडणुकीत गाडून टाका, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात नगरपंचायतीची सत्ता द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी रविवारी केले.
कवठेमहांकाळ येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादीची नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील उपस्थित होते.
यावेळी रोहित पाटील म्हणाले, कवठेमहांकाळची नगरपंचायत निवडणूक ही आबा कुटुंबाच्या अस्तित्वाची लढाई नसून, या शहरातील नागरिकांच्या स्वाभिमानीची लढाई आहे. एखाद्या विधानावरून मला बालिश ठरविणाऱ्यांनी माझा एवढा धसका का घेतला आहे याचे उत्तर द्यावे.
यावेळी अशोकराव जाधव म्हणाले, जनतेने आमच्या पॅनलमधील सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. पालकमंत्री जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, सुरेश पाटील, रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळला स्मार्ट शहर बनवू. विक्रांत पाटील यांनी स्वागत केले. बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले. यावेळी महादेव माळी, नारायण काळे, सुरेखा कोळेकर, संजय कोळी, प्रणोती जाधव, नेताजी पाटील उपस्थित होते.
रोहितचे पॅनेल अधिकृत
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीत कांहीजण हे मतदारांसह शहरातील जनतेची दिशाभूल करीत आहेत; परंतु, रोहित पाटील यांनी उभे केलेल्या उमेदवारांनाच पक्षाचे एबी फाॅर्म देण्यात आलेले आहेत. तेच घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. यामुळे रोहित पाटील, सुरेश पाटील आणि अशोकराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल आहे. याबाबत शंका बाळबागण्याचे कारण नाही.