सांगली : लाॅकडाऊनच्या काळात घरोघरी जाऊन भाजीपाला व फळे विक्री करणे अडचणीचे आहे. त्यासाठी कडक निर्बंधातून सूट देऊन खुल्या मैदानात सुरक्षित अंतर ठेवून भाजी व फळे विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे नेते, सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पवार म्हणाले की, कोरोनामुळे शासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत. पण त्याचा फटका शेतकरी, भाजीपाला, फळ विक्रेत्यांना बसणार आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेला भाजीपाला, फळे ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाहीत. ती शेतात कुजून जातील. त्यासाठी धोरण ठरविण्याची गरज आहे. नव्या नियमानुसार भाजी व फळ विक्रेत्यांना घरोघरी जाऊन विक्री करण्याची मुभा दिली आहे. पण अनेक विक्रेत्यांचे वय पाहता ते अडचणी ठरणार आहे. त्यांना अपार्टमेंटमध्ये तीन ते चार मजले चढणे कठीण आहे.
सांगलीत भाजी, फळ विक्रेते व फेरीवाले यांचे खुल्या मैदानात स्थलांतर करून सुरक्षित अंतराचा अवलंब करीत व्यवसाय सुरू आहे. हा प्रयोग राज्यातही करता येऊ शकतो. जेणेकरून गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. तसेच राज्य शासनाच्या पॅकेजमध्ये भाजीपाला विक्रेत्यांचा समावेश नाही. त्यांनाही आर्थिक मदतीची गरज आहे. त्याचाही विचार व्हावा. या विक्रेत्यांना कडक निर्बंधातून सवलत मिळावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.