आटपाडी : टेंभू योजनेतून वंचित गावांना पाणी देण्यासाठी आणि बंदिस्त पाइपलाइनच्या कामास हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दल, समन्यायी पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. आटपाडी येथील भिंगेवाडी कृषी विद्यालयात श्रमिक मुक्ती दलाच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी आनंदराव पाटील, श्रमिक मुक्ती दल चळवळीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.या वेळी पाटणकर म्हणाले, बंदिस्त पाइपलाइनच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे, या आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर बैठक घेण्यात आली. या कामांना मंजुरी मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याने पाटबंधारे खात्याने १० डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती.दरम्यानच्या काळात पाटबंधारे अधिकारी आणि श्रमिक मुक्ती दल, पाणी चळवळ, शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या. पोटकालवे आणि प्रत्यक्ष बांधापर्यंत पाणी देण्यासाठी किरकोळ सुधारणा केल्या जात आहेत. परंतु अद्याप बंदिस्त पाइपलाइनच्या कामांना सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी ही मंजुरी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
अधिवेशन संपण्यापूर्वी टेंभू योजनेस सुधारित मान्यता द्या, अन्यथा..; भारत पाटणकरांनी दिला इशारा
By अविनाश कोळी | Published: December 14, 2023 5:57 PM