इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराने नुकसान झालेल्या शेतीला भरपाई म्हणून हेक्टरी १ लाखाची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यानी केली आहे.
जाधव म्हणाले, वाळवा तालुक्यातील भरतवाडी, कणेगाव, शिगाव, ऐतवडे बुद्रुक, चिकुर्डे, ताबंवे, शिरटे, बहे, बोरगाव, रेठरेहरणाक्ष, ताकारी, दुधारी, फारणेवाडी, कोळे, बनेवाडी, साटपेवाडी, गौडवाडी, मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, वाळवा गावातील नदीकाठावर मोठ्या प्रमाणात ऊस, भात, सोयाबीन, भाजीपाला आदीसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.
ते म्हणाले, नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी किमान १ लाखाची मदत करावी. वाळवा तालुक्यात जास्त पाऊस पडल्यामुळे घराचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पडझड झालेल्या कुटुंबांना घर बांधणीसाठी २ लाखांची मदत करावी. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षे, टोमॅटो, वांगी, दोडका आदीसह सर्व नदीकाठावरील भाजीपाला पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे, त्या शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक विमा नुकसान भरपाई द्यावी यासाठी पीक विमा कंपन्यांना आदेश द्यावेत.