सांगली : द्राक्षांना दर नाही, म्हणून बेदाणा केला, पण बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे त्यालाही दर मिळण्याची शक्यता कमीच आहे, म्हणून शासनाने द्राक्ष बागायतदारांना एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना टनाला एक लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. १७ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.खराडे म्हणाले, द्राक्ष उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले असून, चार किलोला ७० ते १०० रुपये दर मिळाला आहे. द्राक्षाला दर नाही, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला, पण बेदाणा उत्पादन यंदा प्रचंड झाले आहे. दरवर्षी एक लाख ८० हजार टन बेदाणा उत्पादन होतो, पण या वर्षी दोन लाख ३० हजार टन बेदाणा तयार झाला आहे. जवळपास ५० हजार टन बेदाणा जादा झाल्यामुळे सध्या शीतगृहे फुल झाले असून, बेदाणा ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना जागा मिळत नाही.म्हणून शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. द्राक्ष उत्पादकांना एकरी एक लाख आणि बेदाणा उत्पादकांना टनाला एक लाख रुपयांची भरपाई दिली पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी दि. १७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
आंदोलकांच्या मागण्या
- सौद्यामध्ये बेदाण्याची होणारी उधळण १०० टक्के बंद करावी.
- बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शासनाने शेतकऱ्यांना द्यावेत.
- बेदाणा विक्रीनंतर पैसे २१ दिवसांत मिळावेत, त्यानंतर दिल्यास दोन टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे.
- कीटकनाशकांच्या किमती कमी कराव्यात, त्यावरील जीएसटी कमी करावा.
- शेतकऱ्यांना कमी दराने मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करावा.